आष्टीत डेंग्यूचे ४७ रूग्ण
By admin | Published: October 9, 2014 11:06 PM2014-10-09T23:06:08+5:302014-10-09T23:06:08+5:30
तालुक्यात गत महिनाभरापासून डेंग्यूच्या साथीने थैमान घातले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज ४०० ते ५०० रुग्णांची तपासणी सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत डेंग्यूचे ४७ रुग्ण आढळले आहे.
प्रकोप सुरुच : पेठअहमदपूर, तळेगावात सर्वाधिक प्रमाण
अमोल सोटे - आष्टी (शहीद)
तालुक्यात गत महिनाभरापासून डेंग्यूच्या साथीने थैमान घातले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज ४०० ते ५०० रुग्णांची तपासणी सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत डेंग्यूचे ४७ रुग्ण आढळले आहे. या सर्वांवर उपचार सुरू आहे. तालुक्याच्या ठिकाणासह आणखी तीन गावात डेंग्यूचा प्रकोप असल्याचे समोर आले आहे.
गावागावात घाणीचे साम्राज्य, दुषित व गढूळ पाण्याचा पुरवठा, नालीमध्ये साचलेल्या पाण्यात डासांचे प्रमाण वाढले आहे. सद्या तीव्र उन्ह तापत आहे. नागरिक गर्मीमुळेही त्रस्त आहे. त्यातच ताप येणे, उलट्या, हातपाय, डोकेदुखी या आजारामुळे चिमुकले तथा वयोवृध्द त्रस्त आहे. अनेक कुटुंब गरिबीच्या परिस्थितीत जगत असून खासगी रुग्णालयातील उपचार त्यांना पेलणारा नाही. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून औषध घ्यावे लागत आहे. शासकीय रुग्णालयात रक्ताची चाचणी केल्यानंतर डेंग्यूचे निदान झाल्यावरही प्रशासन संशयीत रुग्ण म्हणून पाहत आहे. याच रुग्णांनी खासगीत तपासणी केल्यास डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
आष्टी येथील तौकीर जाकीर हुसेन (९) याला डेंग्यूच्या आजाराने चांगलेच ग्रासले आहे. त्याला नागपूर येथे खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केल्यानंतर त्याच्या प्रकृतित सुधारणा झाली. दुसरा रुग्ण महेकसभा युसुफ शहा (१२) ही सुद्धा डेंग्यूमुळे आठवडाभर सेवाग्राम रुग्णालयात उपचारार्थ दाखल होती. तिला सद्या आराम आहे. आष्टी व पेठअहमदपूर मध्ये असंख्य रुग्णांना डेंग्यूने ग्रासले आहे. रुग्णांना तत्काळ आराम मिळावा म्हणून खाजगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे. तळेगाव शहरामध्ये १५ च्या वर डेंग्यूचे रुग्ण आढळले आहे. गावातील नाल्या, साचलेले पाणी, दूषित पाण्याचा पुरवठा यामुळे डेंग्यूची साथ जोरात आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टी अंतर्गत दररोज ४०० ते ६०० रुग्णांची तपासणी होत आहे. यात ५० टक्केच्यावर लोकांना तापाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तरीदेखील डॉक्टरांकडून तात्पूरती औषधी देवून वेळ निभावून नेल्या जात आहे. येथील वैद्यकीय अधिकाऱ्याची दोन्ही पदे रिक्त आहेत. तालुका आरोग्य अधिकारी पद देखील रिक्त आहे. या सर्व पदाचा कारभार प्रभारी अधिकारी म्हणून डॉ. एस.एस. रंगारी सांभाळत आहेत. एकाच डॉक्टरच्या खांद्यावर धुरा असल्यामुळे डेंग्यूच्या साथीला आळा घालणे कठीण जात आहे.