४८ सामाजिक संघटनांची न्यायासाठी हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 11:26 PM2018-04-09T23:26:01+5:302018-04-09T23:26:01+5:30

आम्ही वर्धेकर या सामाजिक संघटनेच्या नेतृत्वात रविवारी अनेकांत स्वाध्याय मंदिरात पार पडलेल्या बैठकीनंतर आज विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक दिली. यावेळी शुभांगी उईके हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे देण्यात यावा यासह विविध मागण्यांचे निवेदन पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांना सादर करण्यात आले.

48 social organizations call for justice | ४८ सामाजिक संघटनांची न्यायासाठी हाक

४८ सामाजिक संघटनांची न्यायासाठी हाक

Next
ठळक मुद्देपोलीस अधीक्षकांना साकडे : तपास एसआयटीकडे देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आम्ही वर्धेकर या सामाजिक संघटनेच्या नेतृत्वात रविवारी अनेकांत स्वाध्याय मंदिरात पार पडलेल्या बैठकीनंतर आज विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक दिली. यावेळी शुभांगी उईके हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे देण्यात यावा यासह विविध मागण्यांचे निवेदन पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांना सादर करण्यात आले.
मृतक शुभांगी उईके हिची आत्महत्या नसून हत्या आहे. त्यामुळे सदर प्रकरणाचा तपास त्या दिशेने करण्यात यावा. या घटनेचा तपास एसआयटीकडे सोपविण्यात यावा. या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी पोलीस अधीक्षकांना निवेदनातून करण्यात आली आहे. सकाळी ११ वाजतापासून विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर एकत्र येण्यास सुरूवात केली. सुमारे ११.३० वाजताच्या सुमारास प्रतिनिधींनी पोलीस अधीक्षकांची त्यांच्या दालनात भेट घेत त्यांना निवेदन सादर केले. यावेळी सुमारे पाऊन तास झालेल्या चर्चेत पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांनी शुभांगी उईके आत्महत्या प्रकरणातील विविध पैलूंची माहिती दिली.
संघटनांची बाजू भाष्कर इथापे, मनोहर पंचारिया, रामभाऊ सातव आदींनी पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांच्या समक्ष मांडली. पोलीस अधीक्षकांना निवेदन देताना संजय इंगळे तिगावकर, प्रा. शिवाजी इथापे, हरिष इथापे, सुनीता इथापे, नूतन माळवी, अविनाश काकडे, राजू मडावी, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चारूलता टोकस, जिल्हाध्यक्ष हेमलता मेघे, राजेंद्र शर्मा, अस्लम पठाण, सुचिता ठाकरे, रोटरी क्लबच्या संगिता इंगळे तिगावकर, अमिर अली अजानी, सुनील ढाले, पंकज वंजारे, इक्राम हुसेन, दादाराव सेलकर, महदेव शेंडे आदी उपस्थित होते.
मोबाईल लोकेशन घ्यावे
घटनेनंतर व पूर्वीचे दोन तासाचे सर्व संशयीत आरोपींचे मोबाईल लोकेशन पोलिसांनी घ्यावे. संशयीत आरोपीच्या मोबाईलमधील फोटो शुभांगी त्याला डिलिट करण्यास सांगत होती, हे तपासात समोर आले. तो फोटो ताब्यात घ्यावा. मृतक व संशयीत आरोपी यांच्यात व्हॉटस् अ‍ॅपच्या माध्यमातून संभाषण झाले. ते जप्त करावे. अटकेतील संशयीत आरोपी पोलिसांसाठी खबरी म्हणून काम करायचा. यामुळे अप्रत्यक्षपणे त्याला पोलिसांचे सहकार्य मिळाले. याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. रवी पुरोहीत नामक पोलीस कर्मचाऱ्याचे नाव पुढे येत असल्याने त्या शिपायाच्या मोबाईलवर आरोपीने कधी संपर्क साधला व त्याला काय मदत केली, याची चौकशी करावी, अशी मागणीही चर्चेत करण्यात आली.
रेल्वे चालक व सहकाऱ्याकडून माहिती घेतली
अल्पवयीन मुला-मुलींचे प्रकरण गांभीर्यानेच हाताळले जाते. या प्रकरणात रेल्वे चालक व सहकाऱ्याला विचारणा केली. रेल्वे गाडीसमोर एक व्यक्ती पुढे-पुढे जात होता. ती धावत्या गाडीच्या खाली आली. याची माहिती कंट्रोलला दिल्याचे त्यांनी सांगितले. मृतक व संशयीत आरोपी यांच्यातील संभाषणाचे पुरावे मिळाले. त्या आधारे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविल्याचे एसपींनी सांगितले.
कारवाई प्रस्तावित
प्रारंभी तक्रार घेण्यास हयगय करणाºया दहेगावच्या तत्कालीन ठाणेदारावर पोलीस विभागाद्वारे चौकशी करून कारवाई प्रस्तावित केली आहे. मृतदेह आढळला तेथील रेल्वे स्पीडची माहितीही मागविली.
माधव पडिले यांच्यावर अविश्वास
संघटनांच्या प्रतिनिधींनी आज झालेल्या चर्चेदरम्यान पोलीस अधीक्षक यांच्याकडे सदर प्रकरणाचा तपास ठाणेदाराकडे न ठेवता दुसऱ्याला देण्याची मागणी केली. यावेळी पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांनी सदर प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी माधव पडिले यांच्याकडे सोपवितो, असे सांगितले. हे ऐकताच विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पडिले यांच्या कार्यप्रणालीवर आम्हाला विश्वास नसल्याचे दर्शवित सदर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे द्यावा, असे सूचविले. इतकेच नव्हे तर पोलीस उपअधीक्षक गृह पराग पोटे यांच्याकडे तपास देण्याची विनंती करण्यात आली. त्यावर पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांनीही सहमती दर्शविली.

Web Title: 48 social organizations call for justice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.