480 गोवंशांना लम्पीची लागण; 22 जनावरांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2022 09:02 PM2022-10-26T21:02:44+5:302022-10-26T21:03:13+5:30
आतापर्यंत जिल्ह्यातील ४८० जनावरांना लम्पीने आपल्या कवेत घेत मृत्यूच्या दाढेत नेऊ पाहिले. त्यापैकी तब्बल २२ जनावरांचा मृत्यू झाला आहे. लम्पी संकटकाळात पशुसंवर्धन विभागाच्या सर्वच अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याच्या लेखी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. पण, अनेक अधिकारी या सूचनेकडे पाठ दाखविण्यातच धन्यता मानत आहेत. परिणामी, जिल्ह्यातील पशुपालकांच्या अडचणीत चांगलीच भर पडली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : लम्पी चर्मरोगाला वेळीच ब्रेक लावण्यासाठी जिल्ह्यातील गोवंशांना रोगप्रतिबंधात्मक लस दिली जात असली, तरी लम्पीचा प्रादुर्भाव हळूहळू का होईना, वाढतच आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ४८० जनावरांना लम्पीने आपल्या कवेत घेत मृत्यूच्या दाढेत नेऊ पाहिले. त्यापैकी तब्बल २२ जनावरांचा मृत्यू झाला आहे. लम्पी संकटकाळात पशुसंवर्धन विभागाच्या सर्वच अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याच्या लेखी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. पण, अनेक अधिकारी या सूचनेकडे पाठ दाखविण्यातच धन्यता मानत आहेत. परिणामी, जिल्ह्यातील पशुपालकांच्या अडचणीत चांगलीच भर पडली आहे.
१०२ गावे बाधित
- जिल्ह्यात आतापर्यंत ४८० जनावरांना लम्पी चर्मरोगाची लागण झाल्याचे पुढे आले आहे. लम्पीची लागण झालेली ही जनावरे एकूण १०२ गावांत सापडली असून, याच १०२ गावांना लम्पीबाधित गावे म्हणून पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.
२७५ जनावरे लम्पीमुक्त
- सूत्रीचा अवलंब करून पशुसंवर्धन विभाग लम्पी निर्मूलनासाठी प्रयत्न करीत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात लम्पीबाधित तब्बल ४८० जनावरे सापडली असून, त्यापैकी २७५ जनावरे लम्पीमुक्त झाली आहेत.
१८३ जनावरांवर होत आहेत उपचार
- २२ जनावरांचा लम्पीमुळे मृत्यू झाला असून २७५ जनावरे लम्पीमुक्त झाली आहेत. तर सद्य:स्थितीत १८३ ॲक्टिव्ह लम्पीबाधित जनावरांवर उपचार सुरू आहेत. प्रत्येक लम्पीबाधित जनावराला चांगली आरोग्यसेवा देण्यासाठी प्रयत्न होत आहेत.
२.७३ लाख जनावरांना दिली प्रतिबंधात्मक लस
- लम्पी निर्मूलनासाठी गोट पॉक्स ही लस प्रभावी आहे. वर्धा जिल्ह्याला लम्पी निर्मूलनासाठी आतापर्यंत गोट पॉक्स या लसीचे २ लाख ७५ हजार डोस प्राप्त झाले आहेत. याच लस साठ्याच्या जोरावर आतापर्यंत २ लाख ७३ हजार १६० गोवंशांना लम्पीची प्रतिबंधात्मक लस देऊन सुरक्षित करण्यात आले आहे.
लम्पी चर्मरोगाची लक्षणे
- लम्पी चर्मरोग हा विषाणूजन्य आजार आहे. जनावरांची दूध उत्पादन क्षमता घटते. शिवाय प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो.
- सुरुवातीला जनावरास दोन-तीन दिवस ताप जाणवतो. यानंतर जनावरांच्या सर्व शरीरावर कडक व गोल आकाराच्या गाठी येतात.
- या गाठी ४ ते ५ दिवसांत फुटतात आणि त्यातून पस बाहेर येतो. या गाठी सर्वसाधारणपणे पोट, पाठ पाय व जननेंद्रियाच्या भागात येतात.
- जनावरांच्या डोळ्यांतून, नाकातून पाणी येते.
- तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा खाता येत नाही.
- पायावरील गाठीमुळे जनावरे चालणे कठीण होते.
- डोळ्यांमध्ये व्रण पडतात व कालांतराने दृष्टी बाधित होण्याची शक्यता असते.
- न्यूमोनिया व श्वसन संस्थेची लक्षणे आढळतात.
- अशक्तपणामुळे जनावरांचा या आजारातून बरे होण्यास बऱ्याच दिवसांचा कालावधी लागतो.
- हा आजार बरा होण्यासाठी किमान दोन तीन आठवड्यांचा कालावधी लागतो.