४.८१ लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 10:39 PM2019-03-23T22:39:14+5:302019-03-23T22:39:59+5:30
जिल्ह्यातील २९४ ग्रा.पं.तील सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य पदासाठीच्या निवडणुकीचा महत्त्वाचा भाग म्हणून रविवार २४ मार्चला प्रत्यक्ष मतदान होणार आहे. त्यासाठीची पूर्व तयारी जिल्हा प्रशासनाकडून झाली असून १ हजार ३३ मतदान केंद्रांवरून ही मतदान प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील २९४ ग्रा.पं.तील सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य पदासाठीच्या निवडणुकीचा महत्त्वाचा भाग म्हणून रविवार २४ मार्चला प्रत्यक्ष मतदान होणार आहे. त्यासाठीची पूर्व तयारी जिल्हा प्रशासनाकडून झाली असून १ हजार ३३ मतदान केंद्रांवरून ही मतदान प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. रविवारी या मतदान केंद्रांवरून एकूण ४ लाख ८१ हजार ८१५ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
सर्वात जास्त ग्रा.पं.ची निवडणूक होऊ घातलेला वर्धा हा राज्यातील एकमेव जिल्हा आहे. इतकेच नव्हे तर त्याच अनुषंगाने संपूर्ण जिल्ह्यात ग्रा.पं.च्या निवडणुकीच्या निमित्ताने आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यातील २९८ ग्रा.पं.ची सार्वत्रिक निवडणूक जाहीर करण्यात आली. त्यानंतर अर्ज भरण्याच्या दिवशीपासून अर्ज मागे घेण्याच्या दिवशीपर्यंत घडलेल्या घडामोडीदरम्यान जिल्ह्यातील चार ग्रा.पं.तील निवडणूक अविरोध झाली. त्यामुळे आता जिल्ह्यातील २९४ ग्रा.पं.ची निवडणुकीचा एक भाग म्हणून १,०३३ मतदान केंद्रांवरून प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. शुक्रवारी सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. त्यानंतर आता रविवारी हे प्रत्यक्ष मतदान होणार आहे. जिल्ह्यातील काही मतदान केंद्र संवेदनशील असल्याने तेथे मतदान प्रक्रिया शांततेत पार पडवी यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्तही लावण्यात आला आहे.
४,१३२ कर्मचारी जुंपले
१,०३३ मतदान केंद्राच्या माध्यमातून सदर मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एकूण ४ हजार १३२ कर्मचारी सज्ज करण्यात आले आहेत. शनिवारी जिल्ह्यातील आठही तालुक्याच्या स्थळावरून मतदान केंद्रावर नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांनी कंट्रोल युनिट व बॅलेट युनिट ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण करून सायंकाळी उशीरापर्यंत मतदान केंद्र गाठले.
सरपंचासाठी २,३२९ तर ग्रा.पं. सदस्यांसाठी ४, ३७० उमेदवार निवडणूक रिंगणात
विविध ग्रा.पं.च्या सरपंचपदासाठी सध्या २,३२९ उमेदवार तर ग्रा.पं. सदस्यपदासाठी ४,३७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ४ लाख ८१ हजार ८१५ मतदार २९४ सरंपच व १,५११ ग्रा.पं. सदस्य निवडून देणार आहेत. सदर मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १,१५१ कंट्रोल युनिट तर २,३०० बॅलेट युनिटचा वापर होणार आहे. मतदान केंद्रप्रमुख व विविध साहित्य मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी सुमारे ४२८ वाहनांचा वापर करण्यात आला असून यात बहुतांश वाहने रापमची होती.
१,०३३ पोलीस तैनात
मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर एक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आला आहे. शिवाय जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनाही पोलीस अधीक्षकांकडून विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. संवेदनशील मतदान केंद्रांकडे पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले असून तेथेही शांततेत मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. ग्रा.पं.ची निवडणूक होऊ घातल्यानंतर चार ग्रा.पं.ची निवडणूक अविरोध झाली. यात वर्धा तालुक्यातील उमरी (मेघे), देवळी तालुक्यातील बाभुळगाव (बोबडे), कारंजा (घा.) तालुक्यातील धावसा (बु.) आणि किन्हाळा या ग्रा.पं.चा समावेश आहे.