४९ मद्यपींवर फौजदारी कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 09:56 PM2019-03-04T21:56:19+5:302019-03-04T21:56:33+5:30
महाशिवरात्रीचे औचित्य साधून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून खरांगणा पोलिसांच्यावतीने सोमवारी विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत खरांगणा पोलिसांनी दुपारी ४ वाजेपर्यंत तब्बल ४९ मद्यपींवर फौजदारी कारवाई केली. यात ४५ वाहनचालकांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महाशिवरात्रीचे औचित्य साधून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून खरांगणा पोलिसांच्यावतीने सोमवारी विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत खरांगणा पोलिसांनी दुपारी ४ वाजेपर्यंत तब्बल ४९ मद्यपींवर फौजदारी कारवाई केली. यात ४५ वाहनचालकांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.
मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणे हा मोटर वाहन कायद्यान्वये गुन्हा आहे. शिवाय मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविल्याने सदर वाहनचालकाच्या जीवितास आणि इतरांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. असे असले तरी अनेकजण या नियमाकडे पाठ दाखविण्यातच धन्यता मानतात. खरांगणा पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ढगा येथे महाशिवरात्रीनिमित्त अनेक भाविक दर्शनासाठी येतात. येथे येणाऱ्या भाविकांना कुठलीही गैरसोय होऊ नये. शिवाय कायदा व सुव्यवस्था कायम राहावी आणि अनुचित घटना टाळता यावी यासाठी सोमवारी खरांगणा पोलिसांनी ठाणेदार संतोष शेगावकर यांच्या नेतृत्वासह प्रत्यक्ष हजेरीत विशेष मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान खरांगणा पोलिसांनी ठिकठिकाणी नाकेबंदी करून ‘ब्रिथ अॅनालायझर’द्वारे कुठला वाहनचालक मद्यधुंद अवस्थेत तर नाही ना, याची शहानिशा केली. मोहिमेदरम्यान दुपारी ४ वाजेपर्यंत खरांगणा पोलिसांनी मद्यधुंद असलेल्या चार व्यक्तींसह ४५ वाहनचालकांविरुद्ध फौजदारी कारवाई केली. ही मोहीम राबविण्यासाठी खरांगणा पोलिसांनी ५ महिला गृहरक्षक तर तर ४५ पुरुष गृहरक्षक जवानांचे सहकार्य घेतले.