पाणंद रस्त्यासाठी ५ हजार २४७ किमीचे प्रस्ताव, मंजुरी केवळ ५५४ किमीलाच ?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 06:24 PM2024-07-13T18:24:45+5:302024-07-13T18:26:05+5:30

रोजगार हमी योजनेला नियमांचा खोडा : केवळ ९३ कामे सुरू, अडचणी सुटता सुटेना

5 thousand 247 km proposal for Panand road, approval only for 554 km? | पाणंद रस्त्यासाठी ५ हजार २४७ किमीचे प्रस्ताव, मंजुरी केवळ ५५४ किमीलाच ?

5 thousand 247 km proposal for Panand road, approval only for 554 km

चेतन बेले
लोकमत न्यूज नेटवर्क 
वर्धा :
ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या वहिवाटीच्या अडचणी लक्षात घेता मातोश्री पाणंद रस्ते योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींच्या वतीने पाणंद रस्त्यांसाठी ५ हजार ५४७ किमीचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले. यापैकी केवळ ७५८ किमीच्या रस्त्यांना प्रशासनाकडून मंजुरी देण्यात आली.


रोजगार हमी योजनेतून ही कामे करण्यात येत असली, तरी या कामांना नियमाचा खोडा लागल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी सुटता सुटत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. ग्रामीण भागात शेती मुख्य व्यवसाय असून, अनेकांनी पाणंद रस्त्यावर अतिक्रमण केल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊ लागल्या. त्यावर तोडगा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने पाणंद रस्ते मोहीम हाती घेतली. प्रशासनाचे सहकार्य आणि लोकसहभागातून सुरू केलेल्या या चळवळीची दखल घेत राज्य शासनाने पालकमंत्री पाणंद रस्ते योजना सुरू केली होती.


या योजनेत राज्य सरकारने सुधारणा करुन राज्यात मातोश्री ग्राम पांदन रस्ते योजना सुरू केली. 'मी समृद्ध, तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध, तर माझा महाराष्ट्र समृद्ध' ही संकल्पना मनरेगा व राज्य रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने ग्रामपंचयातीला प्रस्ताव मागविण्यात आले. जिल्हाभरातून ५५३ ग्रामंपचायतींकडून पाच हजार २४७ किमीचे प्रस्ताव सादर करण्यात आले. यापैकी २५ जानेवारी २०२२ ते २९ जानेवारी २०२४ दरम्यान सादर झालेल्या १६ याद्यांमध्ये ५५४ रस्त्याच्या ७५८ किमीच्या कामाला मंजुरी देण्यात आली. २४ कामे रद्द करण्यात आली असून, ४८९ कामांना तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्यात आली. ४१ पाणंद रस्ते तात्रिक व प्रशासकीय मान्यतेसाठी जिल्हा परिषदेसमोर ठेवण्यात आले आहेत. मंजूर झालेल्या रस्त्यांपैकी देवळी वगळता इतर सर्व तालुक्यांत ९३ कामे सुरू असल्याची माहिती मनरेगा विभागाकाडून देण्यात आली आहे.

सुरु असलेली कामे
आर्वी - ३३
आष्टी - १४
देवळी - ०९
हिंगणघाट - 00
कारंजा - ०७
समुद्रपूर - ०६
सेलू - ०५
वर्धा - १९


रोहयोच्या कामासाठी मजूरही मिळेना
मंजूर प्रस्तावाचे काम करण्यासाठी ग्रामपंचायतीला सांगण्यात आले. खोदकामाचा समावेश असल्याने किमान २० मजुरांची आवश्यकता आहे; मात्र खोदकामासाठी २० मजूरही मिळत नसल्याचे सांगण्यात येत आहे. अकुशल कामांना योजनेत प्राधान्य कमी असल्याने ही कामे थांबल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.


२४ पाणंद रस्त्यांची कामे रद्द
मंजूर पांदन रस्त्यांपैकी २४ कामे रद्द करण्यात आली आहेत. यात हिंगणघाट, समुद्रपूर तालुक्यातील ९ पांदन रस्त्यांची कामे बांधकाम विभागाकडे वळती करण्यात आल्याने रद्द करण्यात आली, तर वर्धा तालुक्यातील तळेगाव ग्रामंपचा- यतीचे एक काम शासनस्तरावरून, तर एक कामाचे डबल लोकेशन आल्याने रद्द करण्यात आले आहे. तर सेलू, आणि कारंजा तालुक्यातील पांदन रस्त्याचे डांबरीकरण, लोकेशन डबर दाखविण्यात आल्याने, तसेच वनविभागात रस्ते येत असल्याने १३ कामे रद्द करण्यात आली आहे.


तालुकानिहा प्रस्ताव
तालुका             ग्रामपंचायत          प्रस्ताव           मंजुरी

आर्वी                     ७२                       ३१८                 ७७
आष्टी                     ४१                        १७८                ७०
देवळी                    ६३                       २६०                ८७
हिंगणघाट               ७८                       २८९                ७६
कारंजा                   ३१                        १५०                ३७
समुद्रपूर                 ७७                       ५४६                ५८ 
सेलू                       ९९                        ५०३                ५४
वर्धा                       ९२                         ५७०               ७१


"रोजगार हमी योजनेत कुशल कामांना प्राधान्य देण्यात येते. यात फळबाग लागवड, इतर कामांचा समावेश आहे. पाणंद रस्त्यांच्या कामासाठी मजुरांचा अभाव असल्याने बहुतेक कामे मशिनद्वारे करावी लागतात. त्यामुळे मंजुरी देताना मर्यादा येते. सध्या ७५८ किमी रस्त्यांना मंजुरी दिली असून ९३ रस्त्यांची कामे सुरू आहेत."
- श्रीपती मोरे, उपजिल्हाधिकारी, रोहयो, वर्धा,
 

Web Title: 5 thousand 247 km proposal for Panand road, approval only for 554 km?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.