कारमधून ५० किलो गांजा जप्त
By admin | Published: May 24, 2017 12:42 AM2017-05-24T00:42:37+5:302017-05-24T00:42:37+5:30
हिंदनगर येथे मोठ्या प्रमाणात गांजा आल्याच्या माहितीवरून पोलिसांनी धाड घालून ४९ किलो ८०५ ग्रॅम गांजा जप्त केला आहे.
दोघांना अटक : एकूण ५.५० लाखांचा मुद्देमाल
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : हिंदनगर येथे मोठ्या प्रमाणात गांजा आल्याच्या माहितीवरून पोलिसांनी धाड घालून ४९ किलो ८०५ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. ही कारवाई सोमवारी रात्री करण्यात आली असून या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
प्रचीन उत्तम गायकवाड (३३) रा. हिंदनगर, सिंदी (मेघे), प्रखील शिवदास शंभरकर रा. उगले ले-आऊट, सेवाग्राम अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कारवाईत गांजा, कार व इतर साहित्यासह ५ लाख ५५ हजार २५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रानुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना प्रचीन गायकवाड हा त्याच्या दोन साथीदारासह एमएच १२ सीआर ९४५६ क्रमांकाच्या कारने पवनार मार्गे सिंदी (मेघे) येथील हिंदनगर परिसरात गांजाची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी प्रचीन गायकवाड व प्रखील शंभरकर व अन्य एक इसम यांच्यावर एनडीपीएस कायद्याअंतर्गत छापा घातला. यात त्यांच्या ताब्यातील कारमध्ये गांजा मिळून आला. हा गांजा प्रचीन गायकवाड याच्या घरात लपविण्याचे प्रयत्नात सुरू होते. घटनास्थळी पोलीस पोहोचताच आरोपी प्रखील शंभरकर व अन्य एकाने घटनास्थळावरून पळ काढला. पंचासमक्ष गायकवाडच्या घराची झडती घेतली असता एकूण ४९ किलो ८०५ ग्रॅम गांजा मिळून आला. त्याची किंमत २ लाख ४९ हजार २५ रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच ३ लाख रुपयांची कार व तीन मोबाईल असा एकूण ५ लाख ५५ हजार २५ रुपयांचा मुद्दमाल मिळून आला. या प्रकरणी रामनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. व अपर पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक पराग बी. पोटे, पोलीस उपनिरीक्षक पंकज पवार, पोलीस स्टाफ संजय देवगीरकर, परवेज खान, नरेंद्र डहाके, गिरीश कोरडे, संजय ठोंबरे, दिवाकर परिमल, अमर लाखे, आनंद भस्मे, कुलदीप टांकसाळे, समीर कडवे, जगदीश डफ, सचिन खैरकार, जोत्सना शेळके, चालक नापोशि भूषण पूरी, विलास लोहकरे यांनी केली.