संपकाळात लालपरीच्या एकाच दिवशी ५० फेऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2021 12:31 PM2021-12-26T12:31:12+5:302021-12-26T12:34:59+5:30
आंदोलनकाळात गुरुवारी एकाच दिवशी तीन आगारातून सोडण्यात आलेल्या बसेसने तब्बल ५० फेऱ्या पूर्ण केल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. एकूणच संपानंतर प्रवासी वाहतूक सेवा पूर्वपदावर येण्यासाठी जिल्ह्यात विशेष प्रयत्न होत आहेत.
वर्धा : दिवाळीपासून रापम कर्मचारी कामबंद आंदोलनाच्या माध्यमातून विलीनीकरणासाठी लढा देत आहेत. शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत काही कर्मचारी कर्तव्यावर रुजू झाल्याने रापमच्यावतीने नाममात्र बसेस सोडल्या जात आहेत. असे असले तरी गुरुवारी एकाच दिवशी वर्धा व पुलगाव वगळता तीन आगारातील बसेसने तब्बल ५० फेऱ्या पूर्ण केल्या असून यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यातील वर्धा, पुलगाव, हिंगणघाट, आर्वी तसेच तळेगाव या पाच आगारात एकूण २१७ बसेस आहेत. दिवाळीपूर्वी या बसेसच्या जोरावरच दररोज किमान ८०० हून अधिक बसफेऱ्यांचे नियोजन केले जायचे. त्यावेळी दररोज किमान २५ लाखांचे उत्पन्न वर्धा विभागाला व्हायचे. पण दिवाळीपासून कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केल्याने त्याचा परिणाम प्रवासी वाहतुकीवर झाला. आंदोलनकर्त्यांमध्ये दोन गट तयार होत काही कर्मचारी कर्तव्यावर रुजू झाले असले तरी प्रवासी वाहतूक सेवा पूर्वपदावर आलेली नाही. अशातच आंदोलनकाळात गुरुवारी एकाच दिवशी तीन आगारातून सोडण्यात आलेल्या बसेसने तब्बल ५० फेऱ्या पूर्ण केल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. एकूणच संपानंतर प्रवासी वाहतूक सेवा पूर्वपदावर येण्यासाठी जिल्ह्यात विशेष प्रयत्न होत आहेत.
पोलीस बंदोबस्तात सोडली जाते बस
संपकाळात एसटीवर दगडफेक करण्यात आल्याच्या एकूण तीन घटना वर्धा जिल्ह्यात घडल्या. या नुकसानग्रस्त बसपैकी दोन बसेस आर्वी आगाराच्या तर एक यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा आगाराची आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट, तळेगाव व आर्वी आगारातून सध्या पोलीस बंदोबस्तातच बसेस सोडल्या जात आहेत.