५० हजार नागरिक ‘आधार’पासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 10:15 PM2019-01-12T22:15:45+5:302019-01-12T22:16:22+5:30
समुद्रपूर तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्येच्या गिरड गावासह तब्बल ५० हजार नागरिक आधार केंद्राच्या सुविधेपासून वंचित आहे. परिणामी, नोंदणीसाठी नागरिकांना तालुकास्थळी येरझारा कराव्या लागत असल्याने वेळ आणि पैशाचा अपव्यय होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गिरड : समुद्रपूर तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्येच्या गिरड गावासह तब्बल ५० हजार नागरिक आधार केंद्राच्या सुविधेपासून वंचित आहे. परिणामी, नोंदणीसाठी नागरिकांना तालुकास्थळी येरझारा कराव्या लागत असल्याने वेळ आणि पैशाचा अपव्यय होत आहे. मागील दोन वर्षांपासून गावातील बंद केलेले आधार केंद्र पूर्ववत कायमस्वरूपी सुरू करावे, या मागणीकरिता जिल्हा प्रशासनाला वारंवार निवेदने दिली. प्रशासनाने समस्या लक्षात घेता गिरड येथे आधार केंद्र सुरू करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
गिरड भागातील लाखो नागरिकांना आधार सुविधा देणारी आॅनलाईन यंत्रणा दोन वर्षांपासून बंद करण्यात आली आहे. परिणामी, गावखेड्यातील आॅनलाईन प्रशासकीय कारभार आॅफलाईन झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. प्रत्येक शासकीय आणि निमशासकीय कामासाठी आज आधार कार्ड गरजेचे असताना ते नव्याने काढणे आणि दुरुस्ती करणे जिकरीचे झाले आहे.
सध्या तालुक्याच्या ठिकाणी एका आधार केंद्रावर ही सुविधा पुरविली जात आहे. पेठ, मोहगाव, आर्वी, तावी, फरीदपूर, वानरचुहा, केसलापार, रासा, पिपरी, पिंपळगाव, लोखंडी, साखरा, तळोदी, मंगरूळ, ताडगाव, दसोडा, गणेशपूर, उंदिरगाव, जोगीनगुंफा, शिवणफळ, अंतरगाव, घोरपड, सावंगी, वडगाव, धोंडगाव, हुसेनपूर, शिरपूर, भवानपूर, एदलाबाद, खुर्सार्पार, कवडापूर यासह दोनशेहून अधिक गावखेड्यांकरिता हे एकमेव केंद्र आधार ठरत आहे. यामुळेच नागरिकांना एकाच कामाकरिता वारंवार या केंद्रावर उंबरठे झिजवावे लागत आहे. या आधार केंद्रावर एका दिवशी केवळ ३० ते ३५ जणांचीच नोंदणी केली जाते. पयार्याने आधार कार्ड काढण्यासाठी आलेल्या नागरिकांना आल्यापावली परत जावे लागते. शासकीय योजना, शिक्षण, बँक लिंक, पॅनकार्ड काढण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य आहे. ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे, त्यावर पूर्ण जन्म तारीख नमूद असणे गरजेचे आहे. सुरुवातीला काढण्यात आलेल्या कित्येक आधार कार्डवर जन्मतारखेचा उल्लेख नाही.
याशिवाय अनेकांच्या नावातही त्रुटी आहेत. त्या दुरुस्ती करणे गरजेचे असताना तालुक्यात एकच आधार केंद्र अस्तित्वात आहे.
सध्या सुरु असलेल्या केंद्रावर आधार कार्डसंबंधित सर्व्हर सुरळीत नसल्याने नागरिकांना एकाच कामासाठी वारंवार हेलपाट्या माराव्या लागत आहे. तर आधार पुनर्दुरुस्ती केल्यावरही दोन-दोन महिने आधार कार्ड मिळत नाही. शिष्यवृत्ती अर्ज दाखल करण्यासाठी आधार कार्डवर पूर्ण जन्मतारीख व मोबाईल क्रमांक असल्याशिवाय विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारल्या जात नाही. विविध शासकीय योजनांकरिता चिमुकल्यांपासून तर वृद्धांपर्यंत आधार असणे बंधनकारक आहे. शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीनंतर मिळालेल्या पैशाची उचल करणे, बँकेतून पन्नास हजारांवर पैशाची उचल करण्याकरिता पॅन कार्ड सोबतच आधारदेखील अनिवार्य आहे. मात्र, प्रशासकीय अनास्थेमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
जिल्हा प्रशासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष देत उपाययोजना कराव्या, गिरड येथे तथा तालुकास्थळी समुद्रपूर येथे अतिरिक्त केंद्रे देण्यात यावी, अशी मागणी गिरडसह दोनशी गावांतील नागरिकांनी केली आहे.
एकमेव केंद्रावर दोनशेपेक्षा अधिक गावांचा भार
समुद्रपूर तालुक्यात सुरू असलेल्या सीएससी केंद्राला आधार केंद्र संलग्न करण्यात आले होते. याच केंद्रावर आधार कार्डसंबंधित साहित्य पुरविण्यात आले होते. प्रशासनाकडून कालांतराने हे साहित्य परत घेण्यात आले. सध्या समुद्रपूर येथे असलेल्या केंद्रावर संपूर्ण तालुक्यातील गावखेड्यांचा भार आहे. या एकाच केंद्रावर मोठी गर्दी उसळते. या केंद्रावरही अतिरिक्त पैसे घेतले जात असल्याचा विविध गावांतील नागरिकांचा आरोप आहे.
शिष्यवृत्ती अर्ज दाखल करण्यासाठी आधार कार्डवर पूर्ण जन्मतारीख व मोबाईल क्रमांक असल्याशिवाय विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारल्या जात नाही. विविध शासकीय योजनांकरिता चिमुकल्यांपासून तर वृद्धांपर्यंत आधार बंधनकारक आहे. अपुºया केंद्राअभावी वंचित राहावे लागत असल्याने सर्वच चिंतित आहेत.
समुद्रपूर तालुक्यात पूर्वी पाच ठिकाणी आधार केंद्रे सुरू करण्यात आली होती. या आधार केंद्रामुळे नागरिकांची दस्ताऐवज मिळविण्यासाठीची प्रशासकीय कार्यालयात होणारी दिरंगाई आणि अतिरिक्त पैशाच्या भुर्दंड यापासून मुक्तता झाली. मात्र, काही दिवस सुरळीत चाललेले आधार केंद्र अचानक प्रशासनाने बंद केल्याने परिस्थिती ‘जैसे थे‘ झाली आहे.