अनुदान वाढीसाठी ५०० निराधारांचा शांती मार्च
By admin | Published: September 22, 2016 01:18 AM2016-09-22T01:18:06+5:302016-09-22T01:18:06+5:30
ज्येष्ठ नागरिक व निराधारांचे अत्याचार मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने बुधवारी पाचशे लाभार्थ्यांचा शांती मार्च काढण्यात आला.
उपविभागीय अधिकाऱ्यांंना निवेदन : पोलिसांच्या बंदोबस्तात मार्चचे आयोजन
हिंगणघाट : ज्येष्ठ नागरिक व निराधारांचे अत्याचार मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने बुधवारी पाचशे लाभार्थ्यांचा शांती मार्च काढण्यात आला. स्थानिक आंबेडकर चौक, रूबा चौक, लक्ष्मी टॉकीज, महाविर भवन चौक, कचेरी रोड या मार्गाने मार्ग काढून उपविभागीय अधिकारी स्मिता पाटील यांना मागण्यांचे निवेदनसादर करण्यात आले.
ज्येष्ठ नागरिक व निराधारांना ६०० रू. मासिक अनुदानात वाढ करून १५०० रू. मासिक अनुदान करण्यात यावे. लाभार्थ्यांच्या पात्रतेकरिता वार्षिक उत्पन्न मर्यादा २१०० रुपयांवरून वरून ३५ हजार करण्यात यावी. निराधारांना भारतात कुठेही आजन्म मोफत रेल्वे प्रवास व मोफत आरोग्य सेवा पुरविण्यात यावी आदी प्रमुख मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले.
आयोजित सभेला मार्गदर्शन करताना समितीच्या अध्यक्ष मंगला ठक यांनी या शांती मार्चचे आयोजन कोणत्याही राजकीय, धार्मिक उद्दिष्टपूर्तीकरिता निराधारांना न्याय मिळावा, यासाठी असल्याचे सांगितले. पोलिसांचाही यावेळी चोख बंदोबस्त होता.
पायदळ शांती मार्चचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिक व निराधारांना जागोजागी थंड पाणी, आणि आकस्मिक सेवेची व्यवस्था करण्यात आली. शांती मार्चच्या यशस्वीतेसाठी राहुल दारूनकर, नाजमा कुरेशी, बंडावार, नरेश फुलकर, जाकीर कुरेशी, अरविंद भालशंकर, तिमांडे व कार्यकत्यांनी परिश्रम घेतले.(तालुका प्रतिनिधी)