५० हजारांत झाले मृत अविनाश भागवत जिवंत
By admin | Published: March 8, 2017 01:25 AM2017-03-08T01:25:39+5:302017-03-08T01:25:39+5:30
मृतकाच्या नावावर एका तोतयाला उभे करून शेती विकल्याचा खळबळजनक प्रकार येथे उघड झाला.
बनावट कागदपत्रांवर शेती विक्री प्रकरण
आर्वी : मृतकाच्या नावावर एका तोतयाला उभे करून शेती विकल्याचा खळबळजनक प्रकार येथे उघड झाला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस काठडी ठोठावण्यात आली आहे. अटकेत असलेला प्रेम अमर टोनपे याने रोशन निमकर याच्याकडून ५० हजार रुपये घेवून यशवंत कदम याला तोतया अविनाश भागवत बनवल्याची माहिती तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. यामुळे आर्वीत अवघ्या ५० हजारांत मृत व्यक्ती जिवंत झाल्याची चर्चा आहे.
मृतक अविनाश भागवत यांच्या शेतीच्या विक्री प्रकरणी पोलिसांनी नवी मुंबई येथून प्रेम अमर टोनपे (४५) व त्याचा मावसा यशवंत गोविंदा कदम (६२) या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून प्रकरणाचा तपास सुरू असून त्यांच्याकडून अद्याप पूर्ण माहिती मिळाली नाही. या आरोपींकडून विशेष माहिती अपेक्षित असल्याचे पोलिसांचे म्हणणे असून त्या दिशने तपास सुरू असल्याची माहिती आहे.
पोलीस सुत्रानुसार, तोतया अविनाश भागवत बनविण्याचा व्यवहार रोशन निमकरने पे्रम टोनपे याच्याशी ५० हजारांत ठरविला होता. टोनपे याने नवी मुंबई येथील यशवंत गोविंद कदम याला तोतया अविनाश भागवत बनवून २१ जुलै २०१६ रोजी मुंबईवरून आर्वीला आणल्याचे तपासात समोर आले आहे. त्याचदिवशी सहायक निबंधक यांच्या कोर्टात खोट्या स्वाक्षऱ्या करून हे दोघे मुंबईला १५ हजार नगदी घेऊन रवाना झाले. उर्वरीत ३५ हजार नंतर देण्यात येईल, असा व्यवहार झाल्याची कबुली टोनपे याने दिली.
या प्रकरणाचा तपास ठाणेदार अशोक चौधरी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक संदीप हिवाळे, जमादार विनोद वानखेडे, अखिलेश गव्हाणे करीत आहे.(शहर प्रतिनिधी)
दोन बँकांना घातला
२९ हजारांनी गंडा
अटकेतील दोघांकडून काही माहिती उजेडात आली असून मुख्य आरोपीने वर्धेच्या अॅक्सीस बँकेतून १२ लाख तर पुलगाव येथील आय.सी.आय.सी.आय. बँकेतून १७ लाखांच्या कर्जाची उचल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुलगाव येथे खोटे खरेदी दस्तावेज, सातबारा, आठ अ व अन्य कागदपत्र बँकेला पुरवून १७ लाखांच्या कर्जाची उचल केल्याचे तपसात समोर आले आहे.