निम्न वर्धा प्रकल्पातून होणार ५०५ मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 08:11 PM2024-09-26T20:11:53+5:302024-09-26T20:12:19+5:30

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत झाला सामंजस्य करार

505 MW of solar power will be generated from the Lower Wardha project | निम्न वर्धा प्रकल्पातून होणार ५०५ मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती

निम्न वर्धा प्रकल्पातून होणार ५०५ मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती

आर्वी : निम्न वर्धा प्रकल्पातून तब्बल ५०५ मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती केली जाणार आहे. या तरंगता सौरऊर्जा प्रकल्प विकासासाठी राज्याच्या महानिर्मिती आणि केंद्राच्या सतलज जल विद्युत निगम लिमिटेडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुरुवारी मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

निम्न (लोअर) वर्धा प्रकल्प नजिकच्या वरुड-धानोडी येथील वर्धा नदीवर आहे. यावर प्रस्तावित तरंगता सौरऊर्जा प्रकल्पाकरिता महानिर्मितीने व्यवहार्यता सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार ७३२ हेक्टर जलक्षेत्राची निवड केली जाणार आहे. विकासकामांसाठी ३०३० कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. वार्षिक हरित ऊर्जा निर्मिती १०५१.२८ दशलक्ष युनिट्स अपेक्षित असून ३६ महिन्यांमध्ये हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

तरंगता सौरऊर्जा प्रकल्पामुळे राज्यात सौरऊर्जा निर्मितीला चालना मिळेल. नूतनीकरण योग्य बंध पूर्ण करण्यास, सौरऊर्जा प्रकल्प स्थापित क्षमतेचे आणि निर्मितीचे समतुल्य उत्सर्जन टाळून कार्बन उत्सर्जन कमी करण्यास सहाय्यभूत ठरणार आहे. यातून पारंपरिक ऊर्जा प्रकल्पांसाठी महाग जीवाश्म इंधन खरेदी टाळता येईल. प्रस्तावित ५०५ मेगावॅटच्या क्षमतेला लक्षात घेत, वार्षिक सीओ२ उत्सर्जन जवळपास आठ लाख ६२ हजार ४९ टन कमी होईल. 

वार्षिक कोळशाचाही वापर आठ लाख ४९ हजार ४३४ टनाने कमी होण्यास मदत मिळेल. प्रकल्पात ४९ टक्के सहभाग सतलज जल विद्युत निगम लिमिटेड आणि ५१ टक्के सहभाग महानिर्मितीचा राहणार आहे. या करारावर गुरुवारी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. करार करताना महानिर्मिती आणि सतलज जल विद्युत निगम लिमिटेड, जलसंपदाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

१४०० जणांना मिळणार रोजगार
या प्रकल्पामुळे आर्वी तालुक्याने उद्योग व रोजगार निर्मितीकडे पहिली झेप घेतली आहे. या प्रकल्पामुळे जवळपास १४०० व्यक्तींना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे बेराेजगारी कमी होण्यासही मदत मिळणार आहे.

आर्वी तालुक्यातील धानोडी येथील लोअर वर्धा प्रकल्पावर ५०५ मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पास राज्य सरकारने मान्यता दिली. केंद्राच्या सतलज जलविद्युत निगम व राज्याची महानिर्मिती संयुक्तपणे ३०३० कोटींची गुंतवणूक करून प्रकल्प उभारणार आहे. या प्रकल्पातून १४०० व्यक्तींना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे.
- सुमित वानखेडे, आर्वी

Web Title: 505 MW of solar power will be generated from the Lower Wardha project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.