८२० घरांसाठी ५१ कोटींची तरतूद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 10:32 PM2018-06-08T22:32:03+5:302018-06-08T22:32:03+5:30
प्रधानमंत्री आवास ही महत्वाकांक्षी योजना या ठिकाणी कार्यान्वित होत आहे. संपूर्ण राज्यातील ‘क’ स्तरीय न.प. मध्ये सर्वप्रथम देवळी येथे ही योजना राबविली जात आहे. या अंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील ८२० घरे मंजूर करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : प्रधानमंत्री आवास ही महत्वाकांक्षी योजना या ठिकाणी कार्यान्वित होत आहे. संपूर्ण राज्यातील ‘क’ स्तरीय न.प. मध्ये सर्वप्रथम देवळी येथे ही योजना राबविली जात आहे. या अंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील ८२० घरे मंजूर करण्यात आली आहे. यासाठी ५१ कोटींच्या खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. नझूल लँडसहीत सुटलेल्या घरांचा प्रस्ताव लवकरच पाठविण्यात येत आहे. प्रत्येकाला घर मिळावे, असे आपलेही स्वप्न राहिले आहे, असे प्रतिपादन खा. रामदास तडस यानी केले. प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांच्या एकत्रिकरण मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.
अतिथी म्हणून नगराध्यक्ष सुचिता मडावी, उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर, गटनेता शोभा तडस, न.प. मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे, न. प. सभापती कल्पना ढोक, सारिका लाकडे, सुनीता बकाणे, सुनीता ताडाम, न.प. सदस्य नंदू वैद्य, पवन महाजन, संगीता तराळे, संध्या कारोटकर, अब्दुल नईम आदींची उपस्थिती होती.
खा. तडस पुढे म्हणाले, आदर्श शहर म्हणून देवळीचा विदर्भात नावलौकीक व्हावा यासाठी प्रयत्न होत आहेत. ५ कोटींच्या खर्चातून स्थानिक न. प. माध्यमिक शाळेच्या ईमारतीला अत्याधुनिक करण्यासोबतच डॉ. आंबेडकर ज्ञान मंदिर लायब्ररीला हायटेक करून युपीएससी व एमपीएससीची तयारी करणाऱ्या तरुणांना त्याचा लाभ दिल्या जाणार असल्याचे सांगितले.
शासनाच्या डीपीआर नुसार प्रधानमंत्री आवास योजनेचे चार टप्पे करण्यात आले आहे. ज्यांचेकडे पक्के घर नाही. ज्यांचे घरे नझुल लँडमध्ये आहे. ज्यांचेकडे जमीन आहे; पण घर नाही. तसेच जमीन नसलेल्यांचा या योजनेत समावेश करण्याचे निर्देष आहे. पहिल्या टप्प्यात आर्थिकदृृष्ट्या दुर्बल घटकांचा समावेश करून योजनेतील गती दिली जात आहे, असे विचार मुख्याधिकारी उरकुडे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी नगराध्यक्ष मडावी, उपाध्यक्ष मदनकर व नगरसेवक वैद्य यांनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्याला लाभार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
गरजुंनी लाभ घेण्याचे आवाहन
सदर कार्यक्रमादरम्यान नगराध्यक्ष सुचित मडावी, न.प. उपाध्यक्ष नरेंद्र मदनकर यांच्यासह माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक नंदू वैद्य यांनी मनोगत व्यक्त केले. या मान्यवरांनी शासनाच्या योजनांचा शहरातील गरजुंनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक हजर होते.