५३८ किलो खाद्यतेल जप्त
By admin | Published: September 21, 2015 01:55 AM2015-09-21T01:55:39+5:302015-09-21T01:55:39+5:30
आष्टी येथील दुकानांत विक्रीसाठी साठविलेल्या खाद्य तेलाच्या बॅरलवर कुठल्याही प्रकारचे लेबल, बॅच नंबर, उत्पादन दिनांक, उत्पादकाचा पत्ता आदी नमूद नव्हते.
भेसळयुक्त तेलाची होत होती विक्री : पेठ अहमदपूर येथील कारवाई
वर्धा : आष्टी येथील दुकानांत विक्रीसाठी साठविलेल्या खाद्य तेलाच्या बॅरलवर कुठल्याही प्रकारचे लेबल, बॅच नंबर, उत्पादन दिनांक, उत्पादकाचा पत्ता आदी नमूद नव्हते. यामुळे अन्न व औषधी प्रशासनाने कारवाई करीत तीन बॅरल जप्त केले. सदर बॅरलवर तेलाचे व मातीचे अत्यंत घाणेरडे किटण साचलेले असल्याने ते आरोग्याच्या दृष्टीने घातक असल्याचे कारवाईदरम्यान सांगण्यात आले.
अन्न सुरक्षा अधिकारी रविराज धाबर्डे यांनी रविवारी मे. भूषण किराणा स्टोअर्स, पेठ अहमदपुर ता. आष्टी येथे भेट दिली. सदर दुकानात विक्रीसाठी खाद्यतेलाचे तीन बॅरल साठविल्याचे आढळले. सदर खाद्य तेलाच्या बॅरलची तपासणी केली असता बॅरलवर माती व तेलाचे घाणेरडे किटण लागलेले होते. बॅरलवर कुठल्याही प्रकारचे अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत लेबल नव्हते. यामुळे सदर बॅरलवर बॅच नंबर, उत्पादन दिनांक, बेस्ट बिफोर दिनांक तसेच उत्पादकाचा पत्ता आदी तपशीलही नमूद नव्हता. परिणामी, सदर खाद्यतेल केव्हा निर्मित झाले व कोणत्या तारखेपर्यंत खाण्यास योग्य आहे, याचा कुठलाही खुलासा होत नव्हता. सदर खाद्यतेल हे कोणते आहे, याचाही उलगडा होत नव्हता. सदर खाद्यतेल हे रिफार्इंड सोयाबीन तेल आहे, असे दुकान मालकाने सांगितले.
विक्रेत्याकडे बॅरल खरेदीबाबत कुठलेही बिल नव्हते. कुणाकडून खरेदी केले याचाही दुकान मालकाने खुलासा केला नाही. यामुळे भेसळीची शक्यता असल्याने बॅरलमधून विश्लेषणास्तव नमुना घेत उर्वरित तीन बॅरलधील ५३८ किलो ४०० ग्रॅम तेलाचा साठा किंमत ३४ हजार ९९६ रुपये जप्त करण्यात आला. यातील नमुना विश्लेषणाकरिता पाठविला असून पुढील कारवाई विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर करण्यात येणार आहे. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी रविराज धाबर्डे यांनी सहायक आयुक्त (अन्न) एम.सी. पवार यांच्या मार्गदर्शनात केली. अन्न, जन स्वास्थ व जन आरोग्याच्या दृष्टीने असे खाद्यतेल खाण्याचे टाळावे, असे आवाहन नागपुर विभाग सहआयुक्त एस.एस. देसाई यांनी केले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)