५४ हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित?

By Admin | Published: January 23, 2017 12:37 AM2017-01-23T00:37:48+5:302017-01-23T00:37:48+5:30

दहावीनंतर विविध शाखेचे पूढील शिक्षण घेत असलेल्या इतर मागास वर्ग, अनुसूचित जाती,

54 thousand students deprived of scholarship? | ५४ हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित?

५४ हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित?

googlenewsNext

वर्धा : दहावीनंतर विविध शाखेचे पूढील शिक्षण घेत असलेल्या इतर मागास वर्ग, अनुसूचित जाती, विशेष मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासनाद्वारे स्कॉलरशीप व फ्रिशीप दिली जाते. यंदा जिल्ह्यातील सर्व प्रवर्गातील एकूण ३६ हजार ३४१ विद्यार्थ्यांनी सदर योजनेच्या लाभासाठी अर्ज सादर केले आहेत. यापैकी आतापर्यंत केवळ ४ हजार ३०७ अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. यावर्षासह गत सहा सत्रांची माहिती घेतली असता एकूण ५४ हजार ५२६ अर्ज विविध कारणांनी प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले आहे. सदर विद्यार्थी शासनाच्या योजनेपासून वंचित तर राहणार नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
जिल्ह्यात शिष्यवृत्ती योजना राबविताना मोठा गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले होते. समाज कल्याण उपायुक्त कार्यालयाच्यावतीने झालेल्या गैरप्रकाराबाबत संबंधितांना नोटीसही पाठविण्यात आले आहेत. जिल्ह्यातील शिष्यवृत्ती घोटाळा प्रकरणात अनेक शिक्षण सम्राट व संस्थाचालक अडकले असल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी चौकशी व संबंधित विभागाच्या कार्यवाहीनंतरच कोण दोषी, हे समोर येणार आहे.
शिष्यवृत्ती योजनेचा गरजुंना लाभ मिळावा व सदर कार्य पारदर्शी व्हावे, यासाठी शासनाने या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरणाऱ्यांचे अर्ज आॅनलाईन स्वीकारण्यास सुरूवात केली आहे. सन २०११-१२ या शैक्षणिक सत्रात विविध प्रवर्गातील एकूण ४८ हजार ८९५ अर्ज प्राप्त झाले होते. २०१२-१३ मध्ये ४९ हजार ५०४, २०१३-१४ मध्ये ४८ हजार ३६८, २०१४-१५ मध्ये ४७ हजार ३५३, २०१५-१६ मध्ये ४८ हजार १९८ आणि २०१६-१७ मध्ये आतापर्यंत ३६ हजार ३४१ अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी २०११-१२ मध्ये ४५ हजार ६८६, २०१२-१३ मध्ये ४५ हजार ७०८, २०१३-१४ मध्ये ४४ हजार १४३, २०१४-१५ मध्ये ४४ हजार ५५८, २०१५-१६ मध्ये ३९ हजार ७३१ तर २०१६-१७ मध्ये आतापर्यंत केवळ ४ हजार ३०७ अर्ज निकाली काढण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
यावर्षीसह गत सहा शैक्षणिक सत्रांत आतापर्यंत एकूण २ लाख ७८ हजार ६५९ आवेदन प्राप्त झाले आहेत. यापैकी एकूण २ लाख २४ हजार १३३ अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. स्कॉलरशीप व फ्रिशीपचे आजही ५४ हजार ५२६ अर्ज प्रलंबित आहेत. सदर प्रकरणे संबंधित महाविद्यालयांनी पाठपुरावा न केल्याने, त्यात त्रूट्या असल्याने आणि अन्य काही कारणांनी प्रलंबित असल्याचेही सामाजिक न्याय विभागाकडून सांगण्यात आले आहे. संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप व फ्रिशीप योजनेच्या माध्यमातून शासकीय मदत मिळवून देण्यासाठी योग्य कार्यवाही करणे तथा महाविद्यालयांनी पाठपुरावा करणे गरजेचे झाले आहे.(शहर प्रतिनिधी)

यंदा इतर मागासवर्गीयांची सर्वाधिक प्रकरणे प्रलंबित
स्कॉलरशीप व फ्रिशीपसाठी शैक्षणिक सत्र २०१६-१७ या वर्षाकरिता आतापर्यंत इतर मागास वर्गीय विद्यार्थ्यांचे २१ हजार ८९८, अनु. जातीचे ९ हजार ३६९, विमाप्रचे १ हजार ३५६ तर विजाभज प्रवर्गातील ३ हजार ७१८ अर्ज समाज कल्याण उपायुक्त कार्यालयात प्राप्त झाले आहेत. यापैकी इमावचे २ हजार १९०, अनु. जातीचे १ हजार ४२४, विमाप्रचे २७४ तर विजाभज प्रवर्गातील ४१९ अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. इतर मागासवर्गातील १९ हजार ७०८, अजा ७ हजार ९४५, विमाप्र १ हजार ८२ तर विमुक्त जाती भटक्या जमातीची ३ हजार २९९ प्रकरणे प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले.

अर्जासाठी अंतिम मुदत ३१ जानेवारी
मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क योजनेचे २०१६-१७ मधील नवीन अर्ज नोंदणी व नूतनीकरणाचे अर्ज स्वीकारणे सुरू आहे. योजनेच्या लाभास पात्र ठरणाऱ्यांनी अर्ज आॅनलाईन पद्धतीने सादर करणे क्रमप्राप्त आहे. अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत ३१ जानेवारी देण्यात आली आहे. विहित मुदतीच्या आत अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण निरीक्षक प्रकाश जाधव यांनी केले आहे.

Web Title: 54 thousand students deprived of scholarship?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.