5,546 पुरुष तर 5,272 महिला आता निवडणार लोकप्रतिनिधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2022 10:30 PM2022-10-15T22:30:10+5:302022-10-15T22:31:19+5:30
विविध राजकीय पक्षांनी आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले असून आपलाच उमेदवार निवडून येईल, असे दावे-प्रतिदावे होत आहेत. असे असले तरी सोमवारी मतमोजणीनंतर विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल, हे स्पष्ट होणार आहे. शनिवारी निवडणुकीसाठीचे विविध साहित्य घेऊन अधिकारी मतदान केंद्रांकडे रवाना झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील नऊ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. ही निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये वर्धा तालुक्यातील दोन तर आर्वी तालुक्यातील सात ग्रामपंचायतींचा समावेश असून, रविवारी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे. या निवडणुकीत ५ हजार ५४६ पुरुष तर ५ हजार २७२ महिला मतदार प्रत्यक्ष मतदान करून लोकप्रतिनिधी निवडणार आहेत.
विविध राजकीय पक्षांनी आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले असून आपलाच उमेदवार निवडून येईल, असे दावे-प्रतिदावे होत आहेत. असे असले तरी सोमवारी मतमोजणीनंतर विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल, हे स्पष्ट होणार आहे. शनिवारी निवडणुकीसाठीचे विविध साहित्य घेऊन अधिकारी मतदान केंद्रांकडे रवाना झाले. मतदानादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिसांचा बंदाेबस्त राहणार आहे.
या ग्रामपंचायतींची होणार आहे निवडणूक
- वर्धा तालुक्यातील सालोड (हिरापूर), नांदोरा तर आर्वी तालुक्यातील सर्कसपूर, मांडला, अहिरवाडा, हैबतपूर (पु.), जाम (पु.), पिपरी भुतडा (पु.), मिर्झापूर (नेरी) या ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होणार असून, रविवार, १६ ऑक्टोबरला जिल्ह्यात एकूण ३३ मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष मतदान होणार आहे.
सरपंच पदासाठी २७ उमेदवार निवडणूक रिंगणात
- रविवार, १६ ऑक्टोबरला वर्धा तालुक्यातील दोन तर आर्वी तालुक्यातील सात ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा एक भाग म्हणून प्रत्यक्ष मतदान घेण्यात येत आहे. असे असले तरी सरपंच पदासाठी सर्कसपूर येथे तीन, मांडला येथे पाच, अहिरवाडा येथे दोन, हैबतपूर (पु.) येथे तीन, जाम (पु.) येथे तीन, पिपरी भुतडा (पु.) येथे दोन, मिर्झापूर येथे दोन तर सालोड (हि.) येथे पाच आणि नांदोरा येथे दोघे आपले राजकीय भविष्य आजमावत आहेत.