बोर व्याघ्र प्रकल्पात वन्य प्राण्यांसाठी ५६ पाणवठे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 10:23 PM2018-04-26T22:23:17+5:302018-04-26T22:23:17+5:30
बोर व्याघ्र प्रकल्पातील वन्य प्राण्यांची संख्या मोठी आहे. या प्राण्यांना उन्हाळ्यात त्यांच्या अधिवास असलेल्या परिसरातच पिण्याचे पाणी मिळावे म्हणून वनविभागाने नैसर्गिक व कृत्रिम असे ५६ पाणवठे तयार केले. या पाणवठ्यावर नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
रितेश वालदे।
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरधरण : बोर व्याघ्र प्रकल्पातील वन्य प्राण्यांची संख्या मोठी आहे. या प्राण्यांना उन्हाळ्यात त्यांच्या अधिवास असलेल्या परिसरातच पिण्याचे पाणी मिळावे म्हणून वनविभागाने नैसर्गिक व कृत्रिम असे ५६ पाणवठे तयार केले. या पाणवठ्यावर नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे वन्यप्राण्यांना उन्हाळ्यात जंगलातच पाणी उपलब्ध झाले आहे.
बोर व्याघ्र प्रकल्प ८१२.३२ हेक्टर क्षेत्रात तथा १३८.१२ चौरस किमीमध्ये पसरलेला आहे. यात बोर व न्यू बोर, असे दोन भाग असून वर्धा व नागपूर जिल्हात त्याची सिमा आहे. राज्यातील जैविक विविधता व विपुल वनसंपदा यामुळे वन्यप्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. उन्हाळ्यात प्राण्यांना जंगल क्षेत्रातच पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून बोर प्रकल्प आहे. सोबतच नैसर्गिक दोन, कृत्रिम १९, सोलर पम्प २३, नॅनो सोलर पम्प एक, टँकरद्वारे नऊ, हातपंप दोन असे ५६ पाणवठे आहेत. सोलर पाणवठ्यावर दिवसभर सोलर पम्पाद्वारे पाणी उपलब्ध होते. अन्य पाणवठ्यांवर टँकरद्वारे नियमित पाणी उपलब्ध करून देण्यासाठी दोन शासकीय टँकर व एक भाडेतत्वावरील टँकर सांगून व्यवस्था करण्यात आली. या पाणवठ्यांवर बोर प्रकल्पातील प्राणी तृष्णातृप्तीसाठी येणार असल्याने पर्यटकांनाही त्यांचे दर्शन घडून जंगल सफारीचा आनंद द्विगुणित होऊ शकणार आहे.
बोर व्याघ्र प्रकल्पामध्ये जंगल क्षेत्रात प्राण्यांच्या अधिवासाजवळच पाणवठ्याद्वारे पाणी उपलब्ध करून दिल्याने वन्यप्राण्यांची भटकंती थांबली आहे. बोर व्याघ्र प्रकल्पातील दुर्मिळ प्रजातीच्या वन्यप्राण्यांसोबतच पशु व पक्ष्यांसाठी जंगल क्षेत्रातच पाणी उपलब्ध व्हावे म्हणून वनक्षेत्र अधिकारी के.वाय. तळलेकर, जी.एफ. लुचे यांच्यासह वनरक्षक तथा वन कर्मचारी प्रयत्नरत असल्याचे सांगण्यात आले आहे.
प्राण्यांसह पक्ष्यांनाही आधार
१३८.३२ चौरस किमी परिसरात पसरलेल्या बोर व्याघ्र प्रकल्पातील वन्यप्राण्यांना या पाणवठ्यांचा आधार मिळाला आहे. बोरमध्ये चितळ, सांबर, अस्वली, चिंकारा, चौसिंगा, रानकुत्रे, नीलगाय, रानडुकरे यासह वाघ, बिबट यांनाही उन्हाळ्यात पाणी उपलब्ध झाले आहे. वन्यप्राण्यांसोबत व्याघ्र प्रकल्पातील विविध प्रजातीच्या पक्ष्यांनाही पाणवठ्याच्या परिसरात निवारा उपलब्ध झाला आहे. यात दुर्मिळ पक्ष्यांचाही समावेश आहे. बोर व्याघ्र प्रकल्पात वन्यप्राण्यांच्या अधिवासाजवळच पाणवठयाद्वारे पाणी उपलब्ध करून दिल्यामुळे वन्यप्राण्यांची भटकंती थांबणार आहे.