उज्ज्वला योजनेच्या लाभापासून ५८ महिला वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 01:09 AM2017-07-25T01:09:48+5:302017-07-25T01:09:48+5:30

भारत सरकारच्या प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेतून जोडणी मिळावी म्हणून अर्ज करून वर्ष लोटले; ...

58 women deprived of the benefit of Ujjwala scheme | उज्ज्वला योजनेच्या लाभापासून ५८ महिला वंचित

उज्ज्वला योजनेच्या लाभापासून ५८ महिला वंचित

Next

तहसील कार्यालयावर महिलांचा मोर्चा : आॅनलाईन यादीत नाव नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : भारत सरकारच्या प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेतून जोडणी मिळावी म्हणून अर्ज करून वर्ष लोटले; पण लहानआर्वी येथील ५८ कुटुंबांना गॅस जोडणी मिळाली नाही. आॅनलाईन यादीत नाव नसल्याचे कारण देत टाळाटाळ केली जात होती. याविरूद्ध सरपंच सुनील साबळे यांच्या पुढाकाराने तहसील कार्यालयावर महिलांचा मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदार सीमा गजभिये यांनी त्वरित गॅस एजेंसीला सांगून लाभ देण्याचे निर्देश दिलेत.
लहानआर्वी ग्रामपंचायत अंतर्गत बीपीएलधारक ५८ महिला लाभार्थ्यांचे अर्ज भारत सरकारच्या प्रधानमंत्री उज्वला योजनेतून मोफत गॅस कनेक्शन मिळण्यासाठी २४ आॅक्टोबर २०१६ रोजी मे. अनुसया भारत गॅस एजेंसी यांच्याकडे सादर केले होते; पण एजेंसी धारकांनी मोफत गॅस कनेक्शन मिळवून देण्यात टाळाटाळ केल्याचा आरोप करण्यात आला. संबंधित एजेंसीने ग्राहकांना तुमचे नाव आॅनलाईन यादीमध्ये नसल्याचे कारण समोर केले. याला बीपीएलचे प्रमाणपत्र लावणे गरजेचे नसताना आपण सदर प्रमाणपत्र लावले, त्यामुळे आपणास गॅस कनेक्शन मिळू शकत नाही, अशी मल्लीनाथी केली. आॅनलाईन यादीत नाव असले तरच गॅस कनेक्शन मिळते, असेही लाभार्थ्यांना सांगण्यात आले. या दिशाभूल करणाऱ्या माहितीमुळे महिला लाभार्थी संतप्त झाल्या होत्या.
आॅक्टोबर २०१६ पासून संपूर्ण लाभार्थ्यांचे अर्ज गॅस एजेंसीकडे पडून आहे. वरिष्ठांनी वारंवार सांगूनही याची दखल घेण्यात आली नाही. यामुळे ही योजना नावापुरतीच असल्याची टीका महिलांकडून केली जात होती. परिणामी, गावातील सर्व महिलांनी एकत्र येत सरपंच सुनील साबळे यांना याबाबत माहिती दिली. त्यांनी महिलांना घेऊन तहसीलदार कार्यालय गाठले. याप्रसंगी तहसीलदार सीमा गजभिये यांना निवेदन देण्यात आले. महिलांच्या मागणीची दखल घेत गजभिये यांनीही त्वरित गॅस एजेंसी धारकाला बोलविले. याबाबत भारत पेट्रोलियम कंपनी नागपूरचे विभागीय व्यवस्थापकांनाही सांगण्यात आले. तहसीलदारांनी दखल घेतल्याने महिलांना लवकरच मोफत गॅस कनेक्शन देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. महिनाभरात कनेक्शन न मिळाल्यास तहसीलसमोर आंदोलन करण्याचा इशारा सरपंच साबळे यांनी यावेळी दिला.

दिशाभूल करणाऱ्या माहितीमुळे महिला संतप्त
शासनाकडून उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत मोफत गॅस कनेक्शन दिले जात असताना एजेंसीधारक टाळाटाळ करीत असल्याचे दिसून आले. वर्षभरापासून अर्ज करूनही गॅस सिलिंडर देण्यात आले नाही. उलट आॅनलाईन यादीत नाव नाही, बीपीएल प्रमाणपत्राची गरज नसताना का जोडले, आॅनलाईन यादीत नाव असल्यावरच गॅस कनेक्शन मिळते, अशी दिशाभूल करणारी माहिती एजेंसी धारकाने महिलांना दिली. या प्रकारामुळे लहानआर्वी येथील महिलांनी संताप व्यक्त केला. तहसीलदारांनीही महिलांना न्याय देत जोडणी देण्याचे निर्देश दिले.

उज्ज्वला गॅस योजना केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. प्रत्येक लाभार्थ्यांना मोफत लाभ देणे एजेंसीचे काम आहे. कागदपत्रांमुळे कुणाला वंचित ठेवणे योग्य नाही. यासाठी वाटपाचे निर्देश दिले आहेत.
- सीमा गजभिये, तहसीलदार, आष्टी (शहीद).

Web Title: 58 women deprived of the benefit of Ujjwala scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.