गर्भवतीच्या पोटातून काढला ६ किलोचा ट्यूमर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 12:56 AM2017-09-06T00:56:25+5:302017-09-06T00:56:52+5:30
सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात लेप्रोस्कोपी शस्त्रक्रियेद्वारे गर्भवती स्त्रीच्या पोटातील मोदकाच्या आकाराचा सहा किलो वजनाचा ट्यूमर यशस्वीरित्या काढण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात लेप्रोस्कोपी शस्त्रक्रियेद्वारे गर्भवती स्त्रीच्या पोटातील मोदकाच्या आकाराचा सहा किलो वजनाचा ट्यूमर यशस्वीरित्या काढण्यात आला. रुग्णालयाच्या स्त्रीरोग विभागात पोटदुखीमुळे भरती झालेल्या २४ वर्षीय गर्भवती स्त्रीवर हे उपचार करण्यात आले.
मागील काही दिवसांपासून पोटातील ट्यूमरमुळे होणाºया वेदनेने सदर स्त्री त्रस्त होती. ती गर्भवती असल्याने खुली शस्त्रक्रिया करणेही अवघड होते. अशावेळी, लेप्रोस्कोपिक अर्थात दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय स्त्री-रोगतज्ज्ञ तसेच लेप्रोस्कोपी व हिस्टेरोस्कोपी तज्ज्ञांनी घेतला आणि प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. प्रक्रियेत लेप्रोस्कोपतज्ज्ञ डॉ. नीमा आचार्य, डॉ. सामल, बधिरीकरणतज्ज्ञ डा. चौधरी, डॉ. अविनाश नंदनवार, डॉ. करुणा ताकसांडे यांचा सहभाग होता. सध्या गर्भवती माता व गर्भाशयातील बाळ दोघेही सुखरुप आहेत.
गायनॅकोलॉजीकल एन्डोस्कोपी विभाग गर्भपिशवी काढणे, दुभंगलेली गर्भपिशवी जोडणे, फायब्राईडची गाठ काढणे, वंध्यत्व चिकित्सा करीत आहे. अत्यंत कमी त्रासाची व दोन दिवसांतच रुग्णाला पूर्ववत कार्यरत करणारी ही लेप्रोस्कोपिक प्रक्रिया असल्याचे डॉ. आचार्य यांनी सांगितले.