बस-कंटेनर अपघातात ६ प्रवासी गंभीर जखमी
By admin | Published: September 9, 2016 02:15 AM2016-09-09T02:15:06+5:302016-09-09T02:15:06+5:30
अकोला-हिंगणघाट बसला भरधाव कंटेनरने समोरून धडक दिली. या जबर धडकेत बसचा चुराडा झाला.
अल्लीपूर : अकोला-हिंगणघाट बसला भरधाव कंटेनरने समोरून धडक दिली. या जबर धडकेत बसचा चुराडा झाला. बसमधील चार प्रवाशांसह चालक व वाहक गंभीर जखमी झाले. हा अपघात वर्धा-हिंगणघाट मार्गावर धोत्रा चौरस्ता येथे बुधवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास झाला. बसमधील १७ प्रवासीही किरकोळ जखमी असल्याची माहिती अल्लीपूर पोलिसांनी दिली.
अकोला येथून हिंगणघाटकडे जाणारी बस क्र. एमएच ४० वाय ५८४९ ला विरूद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या कंटेनर क्र. एमएच २९ सी २४० ने जबर धडक दिली. यात बसच्या समोरील भागाचा चुराडा झाला. अपघातात चालक राजेंद्र गाते, वाहक नरहरी जायभाये रा. हिंगणघाट, अफतरीन बानू करीम खान (६३), खुशल्या बानू मुस्तफा खान (५०), समरीया बानू खान (३०) सर्व रा. हिंगणघाट, संजय वामन चौरे (४०) शेगाव कुंड हे गंभीर जखमी झाले. जखमींना सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. बसमधील मिलिंद हरिदास फुलझेले, असरीन फुलीशाह सैय्यदअली, स्वप्नील नवारकर, सुनील महाजन, नवीन ठाकूर, गिरीश गजबे सर्व रा. हिंगणघाट, प्रफुल्ल जरे समुद्रपूर, शहनाज बानो, नामदेव सातघरे रा. कोरेगाव, शखील खान (८) रा. हिंगणघाट, कवडू बावणे, गजानन कोपरकर, अमोल नौकरकर, करुणा बावणे रा. कोरेगाव, नानाजी चिमूरकर, प्रज्ञा मून, संगीता बावणे, अरुण देवतळे रा. हिंगणघाट अशी अन्य जखमींची नावे आहे.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा केला. याप्रकरणी कंटेनर चालकाविरूद्ध कलम २७९, ३३७, ३३८ अन्वये गुन्हा दाखल केला. अपघातानंतर कंटेनर चालक वाहन सोडून घटनास्थळावरून पसार झाला.(वार्ताहर)