जिल्ह्यात सरासरी ६० टक्के मतदान
By admin | Published: April 23, 2015 01:45 AM2015-04-23T01:45:48+5:302015-04-23T01:45:48+5:30
जिल्ह्यात बुधवारी १४ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक तर १४ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी मतदान झाले.
वर्धा : जिल्ह्यात बुधवारी १४ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक तर १४ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी मतदान झाले. सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ११८ जागेसाठी एकूण ३४१ उमेदवार रिंगणात उभे होते. त्याचप्रमाणे पोटनिवडणुकांमध्ये १७ जागेसाठी एकूण ६२ उमेदवार रिगणात उभे होते. जिल्ह्यात सरासरी ६० टक्के मतदान झाले. तळेगाव(श्या.) येथे एका कर्तव्यावर असलेल्या पोलीस शिपायाचा हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत होती. या घटनेव्यतिक्ति मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. तसेच रखरखत्या उन्हातही नागरिकांनी उत्साहाने मतदान केले. गुरुवारी मतमोजणी होणार असून याकडे ग्रामीण जनतेचे लक्ष लागले आहे.
हिंगणघाट तालुक्यातील आजंती, वणी, सिरूड, मोझरी(शे.) आणि कापसी, समुद्रपूर येथील गिरड, कांढळी, लाहोरी, दसोडा, उसेगाव, आष्टी(श.) तालुक्यातील तळेगाव(श्या.पंत) आणि थार, तर कारंजा तालुक्यातील मेटहिरजी, धानोली या १४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान झाले. वर्धा तालुक्यातील सेलसुरा, सालोड (हि.), चितोडा, सावंगी (मेघे), सेलू तालुक्यात दहेगाव, देऊळगाव, हमदापूर, जुनोना तर आर्वी तालुक्यात सालफळ व हिंगणघाट तालुक्यात सावंगी (हेटी), कारंजा तालुक्यात खैरवाडा, सिंदी (विहिरी), तरोडा, सेलगाव (उमाटे) या ग्रामपंचायतीत पोट निवडणूक पार पडली. मतमोजणी गुरूवारी होणार आहे. या अनुषंगाने मतदान होताच कार्यकर्ते आणि उमेदवार मतांची गोळाबेरीज करण्यात व्यस्त झाले.(लोकमत न्यूज नेटवर्क)
जिल्ह्यात सर्वात कमी मतदान वर्धा तालुक्यात नोंदविण्यात आले. तालुक्यातील सालोड, सेलसूरा, सावंगी (मेघे), आणि चितोडा या ग्रामपंचायतीत प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. यात सालोड येथे ७२.९८, सेलसूरा ३८.१, चितोडा ३४.५५ तर सावंगी (मेघे) येथे केवळ ८.७६ टक्के एवढेच मतदान नोंदविण्यात आले.
हिंगणघाट तालुक्यात ६९ टक्के मतदान
तालुक्यात पाच ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक तर एका ग्रामपंचायतीसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. यात आजंती येथे ११ जागांसाठी, लहान वणी - ९, मोझरी (शे.)-९, कापशी- ४ आणि शिरूड येथे ९ जागांसाठी सार्वत्रिक तर सावंगी (हेटी) येथे एका जागेसाठी पोटनिवडणूक पार पडली.
समुद्रपूर तालुक्यात ८८.३ टक्के मतदान
तालुक्यात पाच ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली. उसेगाव, दसोडा, गिरड, लाहोरा आणि कांढळी येथे सार्वत्रिक निवडणुकीत ४७ जागांकरिता मतदान घेण्यात आले. तालुक्यात एकूण ८८.३ टक्के मतदान झाले. विशेष म्हणजे, उसेगाव येथे पहिल्यांदाच सार्वत्रिक निवडणूक पार पडली. कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.