नाफेड तूर खरेदीपासून ६०० शेतकरी वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 11:56 PM2018-05-16T23:56:30+5:302018-05-16T23:56:30+5:30
शासनाच्या नाफेडमार्फत तूर खरेदीची मुदत मंगळवारी संपली. यात सुमारे ६०० शेतकरी वंचित राहिले. बुधवारी अनेक शेतकऱ्यांचा माल बाजार समितीत पडून होता. या शेतकऱ्यांनी युवा सोशल फोरमला माहिती देताच जिल्हा उपनिबंधकांना निवेदन देत चर्चा केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शासनाच्या नाफेडमार्फत तूर खरेदीची मुदत मंगळवारी संपली. यात सुमारे ६०० शेतकरी वंचित राहिले. बुधवारी अनेक शेतकऱ्यांचा माल बाजार समितीत पडून होता. या शेतकऱ्यांनी युवा सोशल फोरमला माहिती देताच जिल्हा उपनिबंधकांना निवेदन देत चर्चा केली. यात मुदतवाढ मिळवून द्या, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला.
नाफेडने तूर खरेदीसाठी २२ मार्चपर्यंत शेतकऱ्यांची आॅनलाईन नोंदणी केली. यानंतर बरेच शेतकरी शिल्लक राहिल्याने नोंदणीस मुदतवाढ देत ती २३ मार्च ते १८ एप्रिलपर्यंत केली. दरम्यान, शेतकऱ्यांनी नोंदणी केली; पण तूरीची खरेदी झाली नाही. नाफेडने शेवटच्या दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत तूर खरेदी केली; पण तरीही तब्बल ६०० च्या वर शेतकरी शिल्लक राहिले. बुधवारी शेकडो शेतकऱ्यांचा माल बाजार समितीत पडून होता. शिवाय अनेकांच्या तुरी घरीच आहेत. याबाबत युवा सोशल फोरमने बुधवारी जिल्हा उपनिबंधकांची भेट घेत चर्चा केली. तूर खरेदीला मुदतवाढीचा प्रस्ताव पाठवून मंजूर करून घ्यावा, पावसाळा सुरू होण्यापूर्वी ही प्रक्रिया करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी नितीन झाडे, मिलिंद मोहोड, सुधीर पांगुळ, अॅड. गोडघाटे, मयूर डफळे, विवेक तळवेकर, सतीश लांबट व शेतकरी उपस्थित होते.