६०० किलो प्लास्टिक जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 11:50 PM2018-06-24T23:50:57+5:302018-06-24T23:51:20+5:30
स्थानिक नगर परिषदेच्या आरोग्य विभागाच्या विशेष पथकाने रविवारी शासकीय सुटीचा दिवस असताना दुपारी २ वाजेपर्यंत वर्धा शहर प्लास्टिकमुक्त करण्याच्या तथा शासन आदेशाचा अंमल करण्याच्या उद्देशाने विशेष मोहीम राबविली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : स्थानिक नगर परिषदेच्या आरोग्य विभागाच्या विशेष पथकाने रविवारी शासकीय सुटीचा दिवस असताना दुपारी २ वाजेपर्यंत वर्धा शहर प्लास्टिकमुक्त करण्याच्या तथा शासन आदेशाचा अंमल करण्याच्या उद्देशाने विशेष मोहीम राबविली. यात पालिका कर्मचाऱ्यांनी तब्बल ६०० किलो थर्माकोल व कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या. शिवाय चार व्यावसायिकांना २० हजारांचा दंड ठोठावून त्याची वसूली करण्यत आली.
स्वच्छ सर्वेक्षण २०१८ च्या निमित्ताने वर्धा शहरातील बेशिस्तांना शिस्त लावण्याचा प्रयत्न पालिकेच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी केला. यावेळी रस्त्याच्या कडेला कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली होती. कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी असतानाही त्याचा वापर वर्धा शहरात होत आहे. सदर प्लास्टिक पर्यावरणासाठी व सुंदर वर्धेसाठी घातक ठरत असल्याने शनिवारपासून वर्धा नगर पालिकेने विशेष मोहीम राबविण्याच्या निर्णय घेतला आहे. शनिवारी अनेक व्यावसायिकांना सूचना देऊनही २५ किलो कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या जप्त केल्यानंतर रविवारी सुट्टीच्या दिवशी या पथकाने दुपारी २ वाजेपर्यंत शहरातील भाजी बाजार, पत्रावळी चौक, अंबीका चौक, बसस्थानक, सिंधी मार्केट, पटेल चौक, दत्तमंदिर चौक आदी भागातील छोट्या व मोठ्या व्यावसायिकांना विशेष मोहिमेदरम्यान मार्गदर्शनात्मक सूचना दिल्या. इतकेच नव्हे तर शनिवारी सूचना देऊनही कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर करताना चार व्यावसायिक आढळून आल्याने त्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड ठोठावून २० हजारांचा दंड वसूल केला.
ही कारवाई न.प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, न.प. प्रशासकीय अधिकारी किशोर साखरकर, न.प. आरोग्य विभाग प्रमुख प्रविण बोरकर यांच्या मार्गदर्शनात अशोक ठाकूर, विशाल सोमवंशी, निखील लोहवे, गजानन पेटकर, लंकेश गोंडेकर, नवीन गोनाडे, आशीष गायकवाड, गुरूदेव हटवार, सतीश पडोळे, स्रेहा मेश्राम आदींनी केली.
शासन आदेशावर अंमल
शासनाने प्लास्टिक व थर्माकोलवर पूर्णत: बंदी आणली आहे. प्लास्टिक पिशवी घेऊन दिसणाºया व्यक्तीवर दंडात्मक कार्यवाही केली जाणार आहे. शिवाय व्यापाऱ्यांवरही ही कार्यवाही केली जात आहे. यात दंडही थोडा थोडका नसून ५००० रुपये आहे. शासनाच्या या निर्णयावर जिल्ह्यातील नगर परिषद, नगर पंचायती, ग्रामपंचायतींनी कार्यवाहीला प्रारंभ केल्याचे दिसून येत आहे. अन्य ठिकाणी जनजागृती तर वर्धेत पालिकेकडून जागृतीसह प्रत्यक्ष कारवाई केली जात आहे. शहरातून प्लास्टिक हद्दपार करून शहर सुंदर व स्वच्छ करण्याच्या उद्देशाने पालिका प्रशासन कामाला लागले आहे.