वर्धा जिल्ह्यात शेतकऱ्यांना ६२५ कोटींचे कर्जवाटप; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
By अभिनय खोपडे | Published: August 23, 2023 04:55 PM2023-08-23T16:55:04+5:302023-08-23T16:56:54+5:30
४७ हजार शेतकऱ्यांना पिककर्जाचा लाभ
वर्धा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामात पीककर्ज पुरवठा करण्यासाठी १ हजार २०० कोटी रुपयाचे लक्षांक प्राप्त झाले होते. परंतू आता यामध्ये १०० कोटी रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे. पूर्वी प्राप्त असलेल्या लक्षांकानुसार खरीप हंगामासाठी ६२५ कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे. कर्ज वाटपाची ही टक्केवारी ७० टक्के इतकी आहे. सर्वच बॅंकांनी त्यांच्याकडे प्राप्त अर्जांप्रमाणे कर्ज प्रकरणे मंजूर केली आहे.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सर्व बॅंकांचा समावेश असलेल्या जिल्हास्तरीय बॅंकर्स समितीचा आढावा घेतला. ज्या बॅंकांचे कर्जाचे वाटप कमी आहे, त्यांनी वाटपाचे प्रमाण वाढविण्याचे निर्देश त्यांनी बॅंकांना दिले. सोबतच शासनाच्या विविध योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्ज प्रकरणांचा देखील त्यांनी आढावा घेतला.
बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी प्रभाकर शिवणकर, आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ.नलीनी भोयर, रिजर्व बँकेचे शशांक हरदोनिया, जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक चेतन शिरभाते, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक सुशांत पाटील, कृषि विभागाचे गुणनियंत्रण अधिकारी परमेश्वर घायतिडक यांच्यासह सर्वच बँकांचे जिल्हा समन्वयक तसेच महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक उपस्थित होते.
ज्या बँकांनी अद्यापपर्यंत 50 टक्के सुद्धा कर्ज वाटप केलेले नाही व ज्यांचे कर्ज वाटप कमी आहे, अशा बँकानी तातडीने कर्ज प्रकरणे मंजूर करावे. एकही पात्र शेतकरी पिककर्जापासून वंचित राहणार नाही, याची बॅंकांनी दक्षता घ्यावी, अशा सुचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी बैठकीत केल्या.
प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व कृषि प्रक्रिया उद्योगासाठीची बॅंकांना विभागांकडून प्राप्त झालेली कर्ज प्रकरणे बँकांनी रद्द करु नये किंवा प्रलंबित ठेऊ नये. हे प्रस्ताव काही कारणास्तव मंजूर होत नसल्यास प्रकरणे नामंजूर न करता संबंधित विभागांना परत करावी. असे प्रस्ताव परिपुर्ण करून पुन्हा बॅंकांना सादर केले जावे, अशा सूचना राहुल कर्डिले यांनी दिल्या. विविध शासकीय योजनेंतर्गत बँकांकडून लाभार्थ्यांना उपलब्ध करुन द्यावयाच्या कर्ज वाटपाचा देखील आढावा त्यांनी घेतला.