शिबिरात ६५७ रुग्णांची नेत्रतपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 11:50 PM2018-02-17T23:50:29+5:302018-02-17T23:53:37+5:30
माहेश्वरी नवयुवक मंडळाच्यावतीने नेत्ररोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते झाले. शिबिरात ६५७ रुग्णांची तपासणी करून १८९ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली.
ऑनलाईन लोकमत
वर्धा : माहेश्वरी नवयुवक मंडळाच्यावतीने नेत्ररोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते झाले. शिबिरात ६५७ रुग्णांची तपासणी करून १८९ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. या शिबिरात १५५ रुग्णांना चष्म्याचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला श्रीराम टावरी, बुलढाणा अर्बन बँकेचे विभागीय व्यवस्थापक विनय राजे, माहेश्वरी मंडळाचे अध्यक्ष कमल भूतडा, महिला अध्यक्ष शोभा गांधी, नवयुवक अध्यक्ष जितेंद्र मोहता, युवती मंडळ अध्यक्ष निमिषा टावरी आदी उपस्थित होते. या या शिबिराची माहिती अजय राठी यांनी प्रास्ताविकातून दिली.
जिल्हाधिकारी नवाल यांनी, रूढी परंपरा व अंधविश्वास यातून बाहेर येऊन नागरिकांनी नेत्रदान करायला हवे. नेत्रदान ही आपली सामाजिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन केले. यावेळी संजय राठी, विनीत चांडक, शरद भूतडा, दीपक भूतडा यांचा नेत्रदान प्रचार प्रसार कार्यासाठी स्मृतिचिन्ह देवून गौरव करण्यात आला.
सेवाग्राम रुग्णालयाचे नेत्ररोग तज्ज्ञ अजय शुक्ला, डॉ. स्मीता शुक्ला यांचाही अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. सोनू लोहिया, डॉ. एस.पी. कलंत्री यांनीही विचार मांडले. अजय राठी यांचाही जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महाराष्ट्रातील शहीद जवानांच्या कुटुंबियांना २५ हजारांची मदत केल्याबद्दल श्रीकांत व गोविंद राठी यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन स्वप्नील बिसानी यांनी केले तर आभार अनुराग राठी यांनी मानले. यावेळी माहेश्वरी समाजातील गणमान्य नागरिक उपस्थित होते.