६६ हजार क्विंटल पांढऱ्या सोन्याची आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 11:56 PM2019-03-16T23:56:37+5:302019-03-16T23:56:56+5:30
पांढरे सोने अशी कापसाची ओळख. परंतु, आसमानी आणि सुलतानी संकटांचा सामनाच पांढरे सोने उत्पादक शेतकऱ्यांना वेळोवेळी करावा लागतो. यंदाही गुलाबी बोंडअळीचा फटका सुरूवातील कापूस उत्पादकांना सहन करावा लागल्याचे वास्तव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पांढरे सोने अशी कापसाची ओळख. परंतु, आसमानी आणि सुलतानी संकटांचा सामनाच पांढरे सोने उत्पादक शेतकऱ्यांना वेळोवेळी करावा लागतो. यंदाही गुलाबी बोंडअळीचा फटका सुरूवातील कापूस उत्पादकांना सहन करावा लागल्याचे वास्तव आहे. असे असले तरी वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकूण ९ केंद्रांवर आतापर्यंत ६६ हजार ४० क्विंटल कापसाची आवक झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून आंजी येथे मंगलमुर्ती कोटेक्स, मदनी येथे सियाराम फायबर कंपनी, उमरी येथे हर्षनिल अॅग्रो, आमला येथे लक्ष्मी जिनिंग, वर्धा येथे कन कॉटन, तनूज कॉटन, मॉ. भवानी कॉटन, एमआयडीसी भागातील शाममोहन व वायगाव येथे सीसीआयच्या केंद्रांवर कापूस खरेदी सुरू आहे. या केंद्रांवर शेतकऱ्यांनी आतापर्यंत मोठ्या प्रमाणात कापूस विक्रीकरिता आणला असून शेतकºयाच्या कापसाला सरासरी ५ हजार ते ५ हजार ७०० रुपये दर मिळाल्याचे सांगण्यात येते. कापूस विक्रीदरम्यान कुठल्याही प्रकारचा त्रास शेतकऱ्यांना होऊ नये यासाठी वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने विशेष प्रयत्न केले जात आहेत.
बुडतोय सेस आणि शासनाचे देखरेख शुल्क
वर्षभऱ्यात कृषी उत्पन्न बाजार समितीला कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून सुमारे ४० लाखांचा सेस तर शासनाला १.०५ टक्के देखरेख फी मिळते. परंतु, सध्या पणन संचालनालय पुणे द्वारे थेट खरेदी परवाने दिले जात असल्याने हा निधीच मिळणे बंद झाल्याचे सांगण्यात येते. वायगाव (नि.) येथे दोन ठिकाणी थेट खरेदी परवान्यांद्वारे कापसाची खरेदी केली जात असून आतापर्यंत किती कापसाची खरेदी झाली. शिवाय कुठल्या शेतकऱ्यांच्या कापसाला किती भाव मिळाला याची माहितीच संबंधित विभागाकडे नाही. त्यामुळे कपाशी उत्पादकांची फसगत होऊ नये यासाठी विशेष उपाययोजना करण्याची गरज आहे.