वर्धा गर्भपात प्रकरण : ५८ दिवसांनंतर ६९४ पानांचे दोषारोपपत्र दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2022 01:38 PM2022-03-10T13:38:33+5:302022-03-10T13:40:13+5:30
आर्वी येथील डॉ. कदम यांच्या रुग्णालयातील अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणात आर्वी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून डॉ. रेखा कदम, डॉ. नीरज कदमसह काही परिचारिकांना अटक केली होती.
वर्धा : आर्वी येथील कदम रुग्णालयात झालेल्या अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणाचा तपास जवळपास पूर्ण झाला असून, सुमारे ५८ दिवसांनंतर आर्वी पोलिसांनी मंगळवारी ६९४ पानांचे दोषारोपपत्र जिल्हा न्यायालयात दाखल केले आहे.
आर्वी येथील डॉ. कदम यांच्या रुग्णालयातील अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणात आर्वी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून डॉ. रेखा कदम, डॉ. नीरज कदमसह काही परिचारिकांना अटक केली होती. त्यानंतर आर्वी पोलिसांनी सखोल तपासणी करून आरोपींविरुद्ध पुरावे गोळा करण्याचे काम सुरू केले. पोलिसांनी तब्बल ५८ दिवस या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून अखेर ६९४ पानांचे दोषारोपपत्र जिल्हा न्यायालयात दाखल केल्याची माहिती आहे. येत्या काही दिवसांत न्यायालयीन कामकाजाला सुरुवात होणार असल्याची माहिती ठाणेदार भानुदास पिदूरकर यांनी दिली आहे.
आरोग्य विभाग मात्र सुस्तच
आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयातून शासकीय औषधांचा अपहार झाल्याची तक्रार वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोहन सुटे यांनी पोलिसांत दिली होती. त्या प्रकरणात पोलिसांनी डॉ. रेखा कदमसह डाॅ. नीरज कदमविरुद्ध पुन्हा गुन्हा दाखल केला. मात्र, त्यानंतर आरोग्य विभागाने यू टर्न घेत तो औषधसाठा उपजिल्हा रुग्णालयातील नाही, असे स्पष्टीकरण दिल्याने आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीबाबत संशय निर्माण झाला. मात्र, अद्यापही आरोग्य विभागाकडून कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नसल्याची माहिती आहे.
कातडी प्रकरणांत चौकशीच सुरू
कदम रुग्णालयात पीडितेच्या गर्भपाताचा प्रकार उजेडात आल्यानंतर संपूर्ण पोलीस प्रशासन कामाला लागले. आर्वी पोलिसांनी संपूर्ण रुग्णालयासह घराची तपासणी केली असता काळविटाची कातडी मिळून आली. त्यामुळे प्रकरण वनविभागाकडे सोपविण्यात आले. मात्र, तब्बल दोन महिन्यांचा कालावधी उलटला असूनही वनविभाग केवळ याप्रकरणाची चौकशीच करताना दिसून येत आहे. वनविभागाने तत्काळ पावले उचलण्याची गरज आहे.
जिल्हा शल्यचिकित्सकांचे मौन
यासंपूर्ण प्रकरणात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सचिन तडस यांच्या कार्यप्रणालीवर संशयाचे वलय निर्माण झाले आहे. कारण वैद्यकीय अधीक्षक म्हणतो की, शासकीय गोळ्यांचा अपहार झाला अन् जिल्हा शल्यचिकित्सक म्हणतात की, औषधसाठ्याचे रेकॉर्ड अप टु डेट आहे. यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी या विषयाबाबत मौन पाळल्याचे दिसून आले.