साहुरवासीयांनी जपली ७ वर्षांची परंपरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 11:32 PM2018-03-03T23:32:50+5:302018-03-03T23:32:50+5:30
अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळ गुरूकुंज आश्रम अंतर्गत मानव जोडो संगठन, साहूर द्वारा रंगाविना धुळवड कार्यक्रम घेण्यात आले.
आष्टी (श.) : अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळ गुरूकुंज आश्रम अंतर्गत मानव जोडो संगठन, साहूर द्वारा रंगाविना धुळवड कार्यक्रम घेण्यात आले. ७ वर्षांची परंपरा कायम ठेवत गावातील शेकडो लोकांनी दिवसभर विविध कार्यक्रमात सहभाग घेतला.
गुरूकुंज आश्रम मोझरी येथून आलेल्या अमोल बांबल आणि बालकलावंतांनी राष्ट्रसंताची एकापेक्षा सरस भजने सादर केली. साहूरच्या लक्ष्मीनारायण मंदिरात आयोजित धुळवड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष उत्तमर करांगळे, ग्रामगीताचार्य प्रा. विनोद पेठे, गुरूदेव सेवा संगठनचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप कोहळे, कवी कृष्णाभाऊ हरले, विद्यापीठ नामकरण लढ्याचे प्रणेते रमेशचंद्र सरोदे, सरपंच वनिता लवणकर, गोपाल अग्रवाल मंचावर उपस्थित होते.
प्रारंभी राष्ट्रसंताच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. यानंतर राष्ट्रसंतांच्या स्वप्नातील भारत आणि ग्रामगीता यावर अमोल बांबल यांनी भाषणातून प्रकाश टाकला. बालकलावंतांनी भजने, कव्वाली सादर केल्या. मी जिजाऊ बोलते एकांकीका सादर केली. अमरावती येथील कलाकार यशश्री काशीकर हिने यातून दमदार अभिनयाची चुणुक दाखविली. त्यानंतर मी सावित्री बोलले एकांकिका साहुरची तरूणी अंकिता शिंदे हिने सादर केली. दोन्ही एकांकिकामधील प्रसंग पाहून साहूरवासी भारावून होते.
सुसुंद्रा येथील विद्यार्थीनी नंदिनी पाटमासे हिने ग्रामगीतेच्या ओवीसह त्यांचा भावार्थ सांगितला. नंदिनीच्या या प्रभावी वक्तृत्वाने तिने उपस्थितांना स्तब्ध केले. यानंतर साहूर गावात गेल्या ४० वर्षापासून निस्वार्थ ग्रामस्वच्छता करणारे वैराग्यमूर्ती देवबाबू निकोडे, पत्रकार अमोल सोटे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला चिमुकले, महिला, पुरूष मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. धुळवडीचा दिवस असूनही कुणीही रंगाची उधळण केली नाही. यानंतर गावातील रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली. भगवी टोपी घालून सर्व गावकरी राष्ट्रसंताच्या विचाराची महती देत होते. कार्यक्रमाचे संचालन हरिभाऊ टाकळकर यांनी तर आभार दीपक खरडे यांनी मानले. आयोजनाला ग्रामस्थांनी सहकार्य केले.