वर्धा जिल्ह्यातील ७० टक्के जलाशयांत पाणी ‘फुल्ल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 01:51 PM2020-08-26T13:51:20+5:302020-08-26T13:52:03+5:30
वर्धा जिल्ह्यातील मोठे धरण म्हणून ओळख असलेल्या बोरधरण येथील जलाशय तब्बल १० वर्षानंतर शंभरी गाठण्याच्या मार्गावर असून जलाशयाच्या तीन दारांमधून पाण्याचा विसर्ग सुरु झालेला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात सुरु असलेल्या संततधार पावसाने पुन्हा एकदा जिल्ह्यातील जलाशयांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपल्बध झाला असून तब्बल पाच जलाशये १०० टक्के भरली आहेत. तसेच जिल्ह्यातील मोठे धरण म्हणून ओळख असलेल्या बोरधरण येथील जलाशय तब्बल १० वर्षानंतर शंभरी गाठण्याच्या मार्गावर असून जलाशयाच्या तीन दारांमधून पाण्याचा विसर्ग सुरु झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
पावसाच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी देखील सध्या अतिपावसाच्या रिपरिपीने चिंतातूर झाला आहे. जूनमध्ये पावसाने उसंत घेतली असल्याने कापूस , सोयाबीन पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले होते. तर काहींची पीके मृतावस्थेत गेली होती. मात्र, मागील १५ दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. सततच्या पावसाने अनेक दिवस नागरिकांना सुर्यदर्शनही झाले नाही. अशातच अंकुरलेल्या पिकांवर रोगाचे देखील सावट आले आहे. सोबतच नदी, नाले, दुथडी भरून वाहत आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे.
मागील अनेक वर्षानंतर बोलधरण जलाशय ८६.६० टक्के भरले आहे. बोर धरणाची पाणी पातळी ३३०.४० मीटर ऐवढी असून त्यापैकी आता ३२८.९० एवढ्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. तसेच जिल्ह्यातील मोठ्या जलाशयांपैकी धामनदी प्रकल्प, पंचधारा प्रकल्प, डोंगरगाव प्रकल्प, मदन प्रकल्प, मदन उन्नई धरण, वर्धा कारनदी प्रकल्प ही सहा मोठी जलाशये शंभर टक्के भरली आहेत. शेतकऱ्यांना रब्बी पीके घेताना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होणार असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात अनेक भागात पाणी पातळीत वाढ झाल्याने उन्हाळ्यात पाणी टंचाईचा समाना करावा लागणार नसून यावर्षी उन्हाळयात पाण्याचे चटके सहन करावे लागणार नसल्याचे चित्र आहे.
आपत्ती व्यवस्थापन समिती सज्ज
मागील काही वर्षांपूर्वी बैल पोळ्याच्या दिवशी बोरधरण प्रकल्पाच्या काही कर्मचाऱ्यांच्या अनावधानाने बोर जलाशयाचे दरवाजे उघडण्यात आले होते. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांत पुरपरिस्थिती निर्माण झाली होते. अनेकांच्या घरात पाणी शिरले होते. त्या घटनेची पुनरावृत्ती न होण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन समिती युद्धस्तरावर काम करण्यासाठी यावेळी सज्ज होती.
१० मध्यम जलाशयांत १०० टक्के पाणीसाठा
वर्धा जिल्ह्यात २० मध्यम जलाशये असून त्यापैकी कवाडी, लहादेवी, अंबाझरी, आंजी बोरखेडी, दहेगाव गोंडी, रोठा, आष्टी, परसोडी आणि हराशी हे तब्बल १० मध्यम जलाशये १०० टक्के भरले आहेत. तर टकाळी (बोरखेडी), मलकापूर, पिलापूर, उमरी ही चार जलाशये शंभरी गाठण्याच्या मार्गावर आहे.