७० टक्के बालकांना पोलिओ लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 11:35 PM2018-01-28T23:35:29+5:302018-01-28T23:38:01+5:30
आरोग्य विभागाने वरिष्ठांच्या सूचनेवरून रविवारी विशेष मोहीम हाती घेऊन ० ते ५ वर्षपर्यंतच्या जिल्ह्यातील ७० टक्के बालकांना पोलिओची लस दिली. जिल्ह्यातील १ हजार ३४० केंद्रावरून ३ हजार २६० कर्मचाऱ्यांसह २६९ पर्यवेक्षकांच्या सहकार्याने....
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आरोग्य विभागाने वरिष्ठांच्या सूचनेवरून रविवारी विशेष मोहीम हाती घेऊन ० ते ५ वर्षपर्यंतच्या जिल्ह्यातील ७० टक्के बालकांना पोलिओची लस दिली. जिल्ह्यातील १ हजार ३४० केंद्रावरून ३ हजार २६० कर्मचाऱ्यांसह २६९ पर्यवेक्षकांच्या सहकार्याने १ लाख १६ हजार ६ बालकांपैकी ७० टक्के बालकांना दुपारपर्यंत पोलिओ लस दिली. सायंकाळी उशीरापर्यंत लस देण्याची प्रक्रिया सुरू होती.
पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ सोहळा जिल्हा सामान्य रुग्णालय येथे घेण्यात आला. सदर कार्यक्रमाला जि.प.च्या मुख्य कार्यपालन अधिकारी नयना गुंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. राज गहलोत, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद वाघमारे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रवीण धाकटे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. स्वाती पाटील, डॉ. मंगेश रेवतकर, प्रभाकर पाटील आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी नयना गुंडे यांच्या हस्ते बालकांना पोलिओची लस पाजण्यात आली. पाच वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या जिल्ह्यातील १ लाख १६ हजार ६ बालकांना एकाच दिवशी पोलिओची लस कशी पाजता येईल यासाठी रविवारी प्रयत्न करण्यात आले. दुपारी ३ वाजेपर्यंत उद्दीष्टापैकी ७० टक्के बालकांना पोलिओची लस देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी दिली. रविवारी राबविलेल्या मोहिमेत जे बालक लस पासून वंचित राहिले असतील त्यांचा शोध घेऊन त्यांनाही लस देण्यात येणार असल्याचे डॉ. अजय डवले यांनी सांगितले.
वीट भट्टीवर काम करणाऱ्यांसह ऊस तोडणाऱ्यांच्या मुलांनाही पाजला डोज
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ८४,८४५ व शहरी भागातील ३१,१६१ असे एकूण १ लाख १६ हजार ६ चिमुकल्यांना पोलिओची लस देण्याचे उद्दीष्ट होते. शिवाय टोल नाके, बस स्थानक, रेल्वे स्थानक आदी ठिकाणी ८६ ट्रान्झीट चमू तर ९३ मोबाईल टिम्सद्वारे विट भट्या व ऊस तोडणारे कामगारांच्या बालकांना लस पाजण्यात आली.
सरपंचाच्या उपस्थितीत मोहिमेचा शुभारंभ
आंजी (मोठी) - येथील आरोग्य केंद्रात राबविण्यात आलेल्या पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ सरपंच जगदीश संचेरीया यांनी चिमुकल्याला लस पाजून केला. कार्यक्रमाला वैद्यकीय अधिकारी डॉ. बहादूरे, आरोग्य सेवक गणेश पवार, शंभरकर, चौधरी, ढबले आदींची उपस्थिती होती. मार्गदर्शन करताना डॉ. बहादूरे यांनी पोलिओ लस बालकांसाठी कशी फायद्याची आहे, याची माहिती दिली. यावेळी मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले. यशस्वीतेकरिता आरोग्य केंद्रातील कर्मचाºयांनी सहकार्य केले.