नात्याला काळिमा; वासनांध आजोबाचा चिमुरड्या नातीवर लैंगिक अत्याचार
By चैतन्य जोशी | Published: August 26, 2022 12:20 PM2022-08-26T12:20:22+5:302022-08-26T12:25:19+5:30
आरोपी आजोबाला माधरात्री अटक, घटनेने उडाली खळबळ
वर्धा : स्त्रिया आणि लहान मुलींवरीवरील लैंगिक अत्याचाराचे इतके गुन्हे उजेडात येत असतानाही असे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांच्या मानसिकतेत कुठलाही बदल होत नसल्याचे धक्कादायक चित्र सातत्याने बघावयास मिळत आहे. आजोबा आणि नातीच्या नात्याला काळीमा फासणारी अशीच एक धक्कादायक घटना वर्धा शहरत 25 रोजी रात्री उघड झाली आहे. याप्रकरणात एका 70 वर्षीय नराधम आजोबाने अवघ्या 7 वर्षीय चिमुकल्या नातीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.
रामनगर पोलिसांनी याप्रकारणी नराधम आजोबाला अटक केली आहे. महिलेच्या पतीचा दोन वर्षांपूर्वी सर्पदंश झाल्याने मृत्यू झाला. त्यामुळे महिला आणि तिची सात वर्षीय मुलगी रामनगर हद्दीत घर असलेल्या तिच्या आई-वडिलांकडे दीड वर्षांपासून राहत आहे. 25 रोजी रात्रीच्या सुमारास सगळे घरी असताना अचानक चिमुरडीच्या आजीचा ओरडण्याचा आवाज आला. चिमुरडीच्या आईने धाव घेतली असता आपल्याच पोटच्या मुलीवर वडिलांना अत्याचार करताना पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली.
नराधम 70 वर्षीय आजोबा त्याच्या खोलीत चिमुरडीशी अनैसर्गिक कृत्य करताना दिसला. महिलेने थेट रामनगर पोलीस ठाणे गाठून याबाबतची तक्रार दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ वासनांध आजोबास अटक केली.
रात्री उशिरा रामनगर पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र इंगळे दाखल झाले. हेमंत चांदेवार यांच्याकडून संपूर्ण घटनाक्रम जाणून घेत गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
आजी ओरडल्याने फुटले बिंग
वासनांध आजोबा त्याच्या खोलीत नातीसोबत दुष्कृत्य करताना दिसला. हे पाहून आजीने जोरजोरात आरडाओरडा केला. आजी ओरडल्याचे पाहून चिमुरडीच्या आईनेही खोलीकडे धाव घेतली आणि हे बिंग फुटले. चिमुरडीने घडलेला सर्व प्रकारच्या आईला सांगितला आणि थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.