७,१८३ चिमुकल्यांसह विद्यार्थ्यांना मिळाला आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 11:44 PM2018-10-31T23:44:00+5:302018-10-31T23:44:38+5:30
कुठल्याही आर्थिक दुर्बल घटक कुटुंबातील विद्यार्थी चांगल्या आरोग्य सूविधांपासून वंचित राहू नये या हेतूला केंद्रस्थानी ठेवून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळा व अंगणवाडींमधील विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कुठल्याही आर्थिक दुर्बल घटक कुटुंबातील विद्यार्थी चांगल्या आरोग्य सूविधांपासून वंचित राहू नये या हेतूला केंद्रस्थानी ठेवून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळा व अंगणवाडींमधील विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येत आहे. हा उपक्रम जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या नेतृत्त्वात राबविला जात आहे. जिल्ह्यातील एकूण २ हजार ८७६ अंगणवाडी तसेच शाळांमधील विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येणार असून आतापर्यंत या उपक्रमाचा ७ हजार १८३ विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्यात आहे. त्यापैकी काहींना आवश्यक साहित्यही वितरित करण्यात आले आहे.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत १३ ते १४ वर्ष वयोगटापासून ० ते १८ वयोगटातील बालकांच्या आरोग्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत करण्यात आली आहे. या पथकामार्फत शाळा व अंगणवाडी मधील बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणाऱ्या शाळांमध्ये जि.प. व अनुदानीत शाळांचा समावेश आहे. शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी वर्षातून एकदा तर अंगणवाडीतील चिमुकल्याची आरोग्य तपासणी वर्षातून दोनदा करण्यात येते. आरोग्य तपासणीदरम्यान प्रामुख्याने ४ डिएसचा, जन्मत: दिव्यांग, विकासात्मक वाढीचे विलंब, आजार, जीवनसत्व कमतरता आदींची चाचपडताळणी केली जाते. आजारी असलेल्या रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात आरोग्य विषयक विशेष सेवा दिली जाते. आतापर्यंत जिल्ह्यातील ७ हजार १८४ विद्यार्थ्यांसह अंगणवाडीतील चिमुकल्यांना या उपक्रमाचा लाभ देण्यात आला आहे. उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक मडावी यांनी केले आहे.
आरोग्य तपासणीसाठी १७ पथक
जिल्ह्यातील अंगणवाडी तसेच शाळांमधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी एकूण १७ चमू करण्यात आले. यात वैद्यकीय अधिकारी (पुरुष), वैद्यकीय अधिकारी (स्त्री) यांच्यासह परिचारिकेचा समावेश आहे.
२.२७ लाख लाभार्थी
जिल्ह्यातील २ हजार ८७६ अंगणवाडीसह शाळांमधील एकूण २ लाख २७ हजार ६०० विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीचा मानस या उपक्रमाच्या माध्यमातून होता. मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासण करून १८ विद्यार्थ्यांच्या हृदय शस्त्रक्रिया, ६७ जणांच्या इतर शस्त्रक्रिया, ५ हजार ९११ जणांची नेत्र रोग तपासणी, ७२९ नेत्र रुग्णांवर उपचार, ३० गरजुंना चष्मे वाटप, सहा कर्णबधीरांना मशीन वाटप तर ४२२ गरजु विद्यार्थ्यांना दंत उपचाराचा लाभ देण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे या सर्व सेवा नि:शुल्क देण्यात आल्या आहेत.