७,१८६ लाभार्थ्यांना मिळणार ‘सौभाग्य’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 11:49 PM2018-04-13T23:49:16+5:302018-04-13T23:49:16+5:30
अंधारात असलेल्या घरांत प्रकाश पोहोचविण्याकरिता शासनाच्यावतीने सौभाग्य योजना राबविण्यात येत आहे. त्याचा अंमल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनापासून होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : अंधारात असलेल्या घरांत प्रकाश पोहोचविण्याकरिता शासनाच्यावतीने सौभाग्य योजना राबविण्यात येत आहे. त्याचा अंमल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनापासून होणार आहे. वर्धेत या योजनेचा लाभ एकूण ७ हजार १६८ लाभार्थ्यांना होणार आहे. यात ४,७६८ एपीएल आणि २ हजार ३८८ लाभार्थी दारिद्र्य रेषेखालील असल्याची माहिती महावितरणच्यावतीने देण्यात आली आहे.
शहरी व ग्रामीण भागातील विद्युतीकरण न झालेल्या प्रत्येक घरकुलाला वीज जोडणी देण्याकरिता पंतप्रधानमंत्री सहज बिजली, हर घर योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेत दारिद्रय रेषेखाली असलेल्या घराला मोफत जोडणी देण्यात येणार आहे. यामुळे अंधारात राहणाऱ्या या घरात आता उजेड दिसण्याची शक्यता आहे.
दारिद्र्य रेषेखाली असलेल्या घरांना दीड पॉइंटची वीज फिटींग आणि एक बल्ब मोफत देण्यात येणार आहे. यात त्यांच्याकडून कुठलेही शुल्क आकरण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. तर एपीएल यादीत असलेल्या लाभार्थ्यांना ५०० रुपये भरावे लागणार आहे. ही रक्कम त्यांना एकमुस्त नाही तर प्रत्येक देयकात लागून येणार असल्याने त्यांना विशेष ताण बसणार नसल्याचे महावितरणच्यावतीने सांगण्यात आले आहे.
योजनेचा लाभ घेण्याकरिता संबधितांनी महावितरणच्या कार्यालयात संपर्क साधावा. शिवाय या योजनेचा लाभ नागरिकांना व्हावा याकरिता महावितरणच्यावतीने शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ घेत अंधाऱ्या घरात उजेड करण्याचे आवाहन आहे.
केरोसीन बचतीवर भर
ग्रामीण भागात घरात दिवा जाळण्याकरिता केरोसीन आवश्यक आहे. यामुळे केरोसीनचा काळाबाजार होत असल्याने त्यावर आळा घालणेही यातून शक्य होणार आहे. यामुळे शासनाने ही योजना राबविण्याकडे विशेष लक्ष पुरविले असल्याचे दिसत आहे.
२८ गावांत लागणार कॅम्प
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनापासून सुरू करण्यात आलेल्या योजनेचा लाभ सर्व गरजवंतांना मिळावा याकरिता जिल्ह्यात तब्बल २८ गावांत कॅम्प लागणार आहे. या कॅम्पात सहभागी होवून नागरिकांना त्याचा लाभ घेण्याचे आवाहन आहे. ही योजना ५ मे २०१८ पर्यंत सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
एपीएल धारकांना देयकात ५० रुपये अतिरिक्त
योजनेचा लाभ दारिद्रय रेषेखाली असलेल्या नागरिकांना मोफत आहे तर एपीएल धारकांना ५०० रुपये भरावे लागणार आहे. ही रक्कम त्यांना एकवेळ नाही तर टप्प्याटप्प्याने भरण्याची मुभा आहे. वीज जोडणी झाल्यानंतर येणाºया प्रत्येक देयकात या रकमेपोटी ५० रुपये वाढीव येणार असल्याचे महावितरणच्यावतीने सांगण्यात आले आहे.