७२ गावे पाणीदार करण्यासाठी लागले असंख्य हात

By admin | Published: April 11, 2017 01:13 AM2017-04-11T01:13:49+5:302017-04-11T01:13:49+5:30

जीवन म्हणजेच पाणी. पाणीच उरणार नाही तर पृथ्वीतलावरील जीवनमान धोक्यात आल्यावाचून राहणार नाही.

72 villagers started to cleanse many hands | ७२ गावे पाणीदार करण्यासाठी लागले असंख्य हात

७२ गावे पाणीदार करण्यासाठी लागले असंख्य हात

Next

ग्रामस्थांचा पुढाकार : अनेक सामाजिक संघटनाही सरसावल्या
राजेश भोजेकर वर्धा
जीवन म्हणजेच पाणी. पाणीच उरणार नाही तर पृथ्वीतलावरील जीवनमान धोक्यात आल्यावाचून राहणार नाही. उशिरा का होईना हेच पाणी वाचविण्यासाठी चळवळी उभ्या होत आहेत. याचाच प्रत्यय आर्वी तालुक्यातील तब्बल ७२ गावांमध्ये येत आहे. निमित्त आहे महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याच्या अभियानाचे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी आर्वी तालुक्यातील ७२ गावांमध्ये हजारो हात निस्वार्थ भावनेने पाण्यासाठी श्रमदानात गुंतले आहे. हे दृश्य ‘साथी हात बढाना..एक अकेला थक जाये तो मिलकर बोझ उठाना...’ या गीताचे स्मरण करून देत आहे.
अभिनेते अमिर खान, सत्यमेव जयतेचे सत्यजीत भटकळ व डॉ. अविनाश पोळ यांनी पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचे अभियान हाती घेतले आहे. या अनुषंगाने मागील वर्षी वॉटर कॅप-१ स्पर्धेचे ३ तालुक्यात यशस्वी आयोजन केले. यंदा वॉटर कॅप-२ मध्ये जलसंधारणासाठी महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यातील ३० तालुक्यांमधील २०१४ गावांची निवड झाली. गावातील ग्रामसभेत ठराव घेऊन या स्पर्धेत भाग घेतला आहे. या गावांतील प्रत्येकी पाच प्रतिनिधींना चार दिवसांचे प्रशिक्षण पाणी फांऊडेशनतर्फे ८४ केंद्रांवर देण्यात आले. त्यांच्या सल्ल्याने पाणलोट व्यवस्थापन आराखडा तयार करून गावाच्या सर्व लोकांना सहभागी करुन श्रमदान व स्वावलंबनाने जलसंधारण कार्य सुरू आहे.

आर्वी तालुक्यातील
१३० पैकी ७२ गावांची निवड
वर्धा : वॉटर कॅप-२ या स्पर्धेसाठी आर्वी तालुक्यातील १३० पैकी तब्बल ७२ गावांची निवड करण्यात आली आहे. सुरुवातीला स्पर्धेमागील भूमिका या गावांना समजावून सांगण्यात अडचणी आल्या. ही केवळ स्पर्धा नाही, तर पाण्याचे महत्त्वही त्यांना समजाविण्यात आले. पाणी नसल्यामुळे आडातपाडात दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. भविष्यात कोरडा दुष्काळ कायमस्वरूपी पडला, तर पाणी पाणी करत जीवन संपेल, हे दिवस यायला वेळ लागणार नाही. ही गंभीर बाब या निमित्ताने गावकऱ्यांना समजाविण्यात यश आले. यानंतर आर्वी तालुक्यातील ७२ हा गावांतून असंख्य महिला-पुरुषांचे हात जलसंधारणाच्या कामाला लागली आहे. ही स्पर्धा असली तरी यामुळे ही गावे पाणीदार होणार आहे. हे लक्षात येताच काही सामाजिक संघटनांनीही पुढाकार घेतला आहे. यामध्ये भारतीय जैन संघटना, जनहीत मंच, युवा सोशल फोरम या संघटनांसोबतच वर्धेतील हनुमान टेकडीवर जलसंधारणाचे ‘मॉडेल’ उभी करणारी वैद्यकीय जनजागृती मंच ही संघटनाही या कामात सरसावली आहे. माळेगाव (ठेका) येथे सुरेश देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयातील अंकित जयस्वाल, प्रिया बाळसराफ, हर्षवर्धन बानोकर, हिमांशू लोहकरे विद्यार्थ्यांसह व गावातील काही युवकांनी गावकऱ्यांना या स्पर्धेचे महत्त्व पटवून देण्याची मोलाची कामगिरी बजावली. माळेगाव(ठेका) या गावात जलसंधारणाच्या कामांना गती देण्यात या विद्यार्थ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या समाजोत्थनाच्या कार्यात या गावांना प्रत्येकी पाच दिवस जलसंधारणाच्या कार्यासाठी भारतीय जैन संघटना जेसीबी वा पोकलेन मशीन पुरविण्याचा प्रयत्न करणार आहे. यासाठी सहयोग करण्याचे आवाहनही भारतीय जैन संघटनेने केले आहे.

अनेक संघटना सरसावणार
८ एप्रिल ते २२ मे अशी ४५ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेसाठी निवड झालेल्या आर्वी तालुक्यातील ७२ गावांना पाणीदार करण्यासाठी पुन्हा काही स्वयंसेवी व सामाजिक संघटना जुळणार असल्याचे बोलले जात आहे. श्रमदानातून दिवसागणिक असंख्य हात लागत असल्यामुळे आर्वी तालुक्यातील ७२ गावांमध्ये सुरू असलेल्या चळवळीला चांगलीच गती आली आहे.

अन् जिल्हाधिकाऱ्यांनीही केले श्रमदान
आर्वी तालुक्यातील माळेगाव(ठेका) या गावाचीही वॉटर कॅप-२ स्पर्धेसाठी निवड झाली. या गावांत श्रमदानात असंख्य हात लागले. या कामांची पाहणी करण्यासाठी खुद्द जिल्हाधिकारी शैलेश नवाल हे सोमवारी सकाळीच पोहचले. प्रत्येकजण कामात गुंतला असल्याचे पाहून त्यांनाही राहवले नाही. त्यांनीही कुदळ घेत श्रमदान केले.

Web Title: 72 villagers started to cleanse many hands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.