दिवाळीच्या सुट्यांत बोर अभयारण्याला ७२३ पर्यटकांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2021 05:36 PM2021-11-10T17:36:14+5:302021-11-10T17:39:06+5:30
१५ ऑक्टोबरपासून पर्यटनाला सुरुवात झाली. तेव्हापासून बोर अभयारण्याला ७२३ पर्यटकांनी भेट दिली. त्यात ३९१ जणांनी ऑफलाईन तर ३३२ पर्यटकांनी ऑनलाईन प्रवेश सुविधेचा लाभ घेतला.
वर्धा : मागील दोन वर्षांपासून कोरोनाचे बंधन कायम असल्याने नागरिक घरातच बंदिस्त झाले होते. यंदा कोरोना प्रभाव ओसरल्यानंतर नागरिकांनी दिवाळीच्या सुट्यांत पर्यटनाचा आनंद लुटला, सेलू तालुक्यातील बोर अभयारण्याला ७२३ पर्यटकांनी भेट दिल्याची माहिती मिळाली आहे.
१५ ऑक्टोबरपासून पर्यटनाला सुरुवात झाली. तेव्हापासून बोर अभयारण्याला ७२३ पर्यटकांनी भेट दिली. त्यात ३९१ जणांनी ऑफलाईन तर ३३२ पर्यटकांनी ऑनलाईन प्रवेश सुविधेचा लाभ घेतला. यातून वनविभागाच्या महसुलात १ लाख ४ हजार ४०० रुपये जमा झाले आहेत. नागरिकांनी या पर्यटन स्थळाला भेट देऊन निसर्गाचा आस्वाद घेतला.
सध्या वर्धा व नागपूर जिल्ह्याच्या सीमेत दोन गेट आहेत. त्यातील एक गेट अडेगाव तर दुसरे गेट बोरगेट आहे. अडेगाव गेट बंद असून, बोरगेटमधूनच पर्यटकांना आत सोडले जात आहे. १४ जिप्सी गाड्या पर्यटकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या पर्यटन स्थळावर नागपूर-वर्ध्यासह विदर्भाच्या विविध भागांतून पर्यटक भेटी देत आहेत. मात्र, या पर्यटन स्थळाकडे जाणारा रस्ता अतिशय खराब झाला असल्याने वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. बोर पर्यटन क्षेत्राच्या ठिकाणी अधिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकाऱ्यांनी अलीकडेच बैठक घेऊन दिशानिर्देश दिले आहेत. जेणे करून जिल्ह्याचा महसूल पर्यटनाच्या माध्यमातून वाढेल असे हे नियोजन आहे.