शहराच्या भुयारी गटार योजनेसाठी ७५ कोटी
By admin | Published: March 19, 2017 12:46 AM2017-03-19T00:46:55+5:302017-03-19T00:46:55+5:30
शहरातील नाले व नाल्या भुयारी करण्यासाठी अमृत अभियानांतर्गत ७५ कोटी रुपयांचा निधी सन २०१७-१८ मध्ये उपलब्ध होणार ...
वर्धेच्या आमदारांची माहिती : शहरातून वाहतात सात नाले
वर्धा : शहरातील नाले व नाल्या भुयारी करण्यासाठी अमृत अभियानांतर्गत ७५ कोटी रुपयांचा निधी सन २०१७-१८ मध्ये उपलब्ध होणार असल्याची माहिती आ.डॉ. पंकज भोयर यांनी दिली. हा निधी लवकरच प्राप्त होणार असून या प्रकल्पाचा अंतिम आराखडा तयार करण्यात येणार आहे.
वर्धा पालिकेच्या हद्दीत सात मोठे नाले व ८२ कि.मी. च्या नाल्या आहेत. सदर नाले व नाल्या उघड्या असल्यामुळे शहरवासियांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. सोबतच त्यांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण होतो. वर्धा शहरात भुयारी गटारी योजना कार्यान्वित व्हावी यासाठी आ. डॉ. पंकज भोयर यांनी शासनदरबारी पाठपुरावा केला होता. या योजनेत राज्यातील ४४ शहरे असून त्यात वर्धा एक आहे. या योजनेंतर्गत वर्धा शहरातील पाणी पुरवठा योजनेसाठी ३५.२६ कोटी रुपये मंजूर झाले होते. या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून पाईपलाईन टाकण्याचे काम शहरात सुरू आहे.
पालिका निवडणुकीच्या काळात आ.डॉ. भोयर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर भुयारी गटारी मार्गासाठी निधी देण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने ७५ कोटी रुपयांचा वर्धा शहर भुयारी गटार प्रकल्पाचा समावेश करण्यात आला आहे. याबाबत आ.डॉ. पंकज भोयर यांना नगर विकास विभागाचे कक्ष अधिकारी निलेश पोतदार यांनी गुरुवारी पत्र दिले आहे. सदर पत्रात प्रकल्पासाठी ७५ कोटी रुपयांची तरतुद करण्यात आल्याचे कळविले आहे.
या प्रकल्पांतर्गत वर्धा शहरातील ७ नाल्यांचे दहा कि.मी. चे भुयारी गटार मार्गामध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. सोबतच शहरातील ८२ कि.मी.च्या नाल्या भुयारी करण्यात येणार आहे. या नाल्यांना शहरातील २५ हजार घरामधील सांडपाणी नालीने जोडण्यात येणार आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती व दुर्गंधीपासून शहरवासियांची सुटका होणार आहे. वर्धा शहरातील सांडपाणी एका ठिकाणी जमा करून त्यावर प्रक्रिया करून सदर पाणी बगीचा, शेती व उद्योगासाठी दिल्या जाणार आहे. त्यामुळे नगर पालिकेच्या उत्पन्नातही वाढ होणार आहे. या प्रकल्पाची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे राहणार आहे. यामुळे शहरातील गंभीर समस्या निकाली निघाणार असल्याची माहिती आ.डॉ. पंकज भोयर यांनी दिली.(प्रतिनिधी)