जिल्ह्यात ७५ टक्के पेरण्या
By admin | Published: July 6, 2016 02:24 AM2016-07-06T02:24:49+5:302016-07-06T02:24:49+5:30
यंदा मान्सून वेळेवर दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. यामुळे शेतकऱ्यांनी आधीच पेरण्यांसाठी शेतजमीन तयार करून ठेवली होती;
सततच्या पावसाने खर्च वाढणार : ५१ हजार हेक्टरमध्ये तुरीचा पेरा
वर्धा : यंदा मान्सून वेळेवर दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. यामुळे शेतकऱ्यांनी आधीच पेरण्यांसाठी शेतजमीन तयार करून ठेवली होती; पण मान्सून विलंबाने दाखल झाला. असे असले तरी समाधानकारक पाऊस झाल्याने जिल्ह्यातील बहुतांश पेरण्या साधल्याचे चित्र आहे. मंगळवारपर्यंत जिल्ह्यातील ७५ टक्के पेरण्या आटोपल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. यात आतापर्यंत तब्बल ५१ हजार हेक्टरमध्ये तुरीची पेरणी झाल्याचे आकडेवारी स्पष्ट करते.
खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांचा सर्वाधिक भर कपाशी आणि सोयाबीन या नगदी पिकांकडे असतो; पण गत काही वर्षांपासून होत असलेली नापिकी आणि वधारलेले तुरीचे भाव पाहता यंदा तुरीचा पेरा वाढणार, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. दरवर्षी कृषी विभागाकडून पेरणीचे नियोजन केले जाते. यंदाही तुरीच्या ७१ हजार हेक्टर क्षेत्रामध्ये तुरीची लागवड केली जाईल, असे नियोजन करण्यात आले होते. मंगळवारपर्यंत हा आकडा ५१ हजार १११ हेक्टरपर्यंत पोहोचला आहे. तूर पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ६५ हजार हेक्टर आहे. गतवर्षी यातील ६० हजार ७५३ हेक्टरमध्ये तूर पिकाची पेरणी झाली होती. यंदा यात वाढ करून ७५ हजार हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले असून त्यावर तुरीची पेरणी होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कपाशीच्या लागवडीत घट आल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी २ लाख २६ हजार ४७४ हेक्टरमध्ये कपाशीची लागवड झाली होती. यंदा आतापर्यंत १ लाख ८९ हजार ६५९ हेक्टरमध्ये कपाशीची लावण करण्यात आली आहे. या पाठोपाठ सोयाबीनची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात ७६ हजार ९२९ हेक्टर क्षेत्रामध्ये सोयाबीनची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे. आणखी २५ टक्के पेरण्या शिल्लक असल्याने सोयाबीन आणि तुरीच्या क्षेत्रात वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
पाऊस उशिराने आला असला तरी गत काही दिवसांपासून समाधानकारक बरसत असल्याने शेतकरी सुखावला आहे. जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पेरणी केली होती; पण ही पेरणी अत्यल्प होती. मान्सूनपूर्व पेरणी करणाऱ्या व ओलिताची सोय नसलेल्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा सामना करावा लागला. मान्सूनचे आगमन झाल्यानंतर बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आणि त्या बऱ्यापैकी साधल्याचे सांगण्यात आले आहे.
जिल्ह्यात सरासरी ४ लाख २५ हजार ६५३ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली असून ४ लाख २८ हजार ७०० हेक्टरमध्ये खरीपाची पेरणी होणार असल्याचे नियोजन कृषी विभागाकडून करण्यात आले होते. यातील मंगळवारपर्यंत ३ लाख २० हजार ३४७ हेक्टर क्षेत्रावरील विविध पिकांच्या पेरण्या शेतकऱ्यांनी आटोपल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.(कार्यालय प्रतिनिधी)
खतांचा मुबलक साठा उपलब्ध, कृषी विभागाची ग्वाही
कृषी विभागाच्यावतीने यंदा खतांचे योग्य नियोजन करण्यात आले असून कृषी केंद्रांवरही करडी नजर ठेवण्यात आली आहे. यामुळे यावर्षी लिंकींग वा खतांचा तुटवडा, या तक्रारी हद्दपार झाल्याचे सांगण्यात आले आहे. शिवाय शेतकऱ्यांना बांधावरही खत पोहोचविण्यात आले असून खतांचा मुबलक साठा उपलब्ध असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. यावर्षी १ लाख २४ हजार ४०० मेट्रीक टन खतांचे आवंटन मंजूर झाले आहे. तो उपलब्ध झाला असून तालुकानिहाय नियोजन करण्यात आले. शिवाय गतवर्षीचा ३३ हजार ४८० मेट्रीक टन खताचा साठाही उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली.
गळीत धान्यात सोयाबीनलाच पसंती
कमी कालावधीचे पीक असलेल्या सोयाबीनकडे गत काही वर्षांपासून शेतकऱ्यांचा कल वळलेला आहे. यंदाही जिल्ह्यासत बऱ्यापैकी सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. कृषी विभागाने १ लाख १० हजार हेक्टरचे नियोजन केले असताना मंगळवारपर्यंत ७६ हजार ९२९ हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी झाल्याचे सांगण्यात आले.