76.46 टक्के मतदारांनी बजावले राष्ट्रीय कर्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2021 05:00 AM2021-12-22T05:00:00+5:302021-12-22T05:00:02+5:30

सेलू नगरपंचायतीच्या १३ जागांसाठी तब्बल ६५ उमेदवार आपले राजकीय भविष्य आजमावत असून, मंगळवारी सेलू शहरातील १४ केंद्रांवरून प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले. सेलू येथे ८ हजार ९६० मतदारांपैकी ६ हजार ६७९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. येथे मतदानाची सरासरी ७४.५४ इतकी राहिली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे यांनी काम पाहिले. विशेष म्हणजे, शहरातील प्रत्येक मतदान केंद्रावर कोविड नियमांचेही पालन करण्यात आले.

76.46 per cent voters performed national duty | 76.46 टक्के मतदारांनी बजावले राष्ट्रीय कर्तव्य

76.46 टक्के मतदारांनी बजावले राष्ट्रीय कर्तव्य

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
वर्धा : जिल्ह्यातील कारंजा, आष्टी, सेलू व समुद्रपूर या चार नगरपंचायतींच्या एकूण ५४ जागांसाठी मंगळवारी प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले. सदर चारही नगरपंचायतीतील एकूण २८ हजार ७३३ मतदारांपैकी ७६.६४ टक्के मतदारांनी मतदान केंद्रावर जात मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावले. एकूणच जिल्ह्यातील चारही नगरपंचायत क्षेत्रात मंगळवारी शांततेत मतदान झाले.
आष्टी नगरपंचायतीच्या १३ जागांसाठी आष्टी शहरातील १३ मतदान केंद्रांवरून मतदान घेण्यात आले. मंगळवारी २ हजार १४५ महिला तर २ हजार ४४५ पुरुष असे एकूण ४ हजार ५९० मतदारांनी प्रत्यक्ष मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावले. एकूणच आष्टी येथे नगरपंचायतीच्या १३ जागांसाठी ७२.०९ टक्के मतदारांनी प्रत्यक्ष मतदान केले.  तेथे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी मनोजकुमार खैरनार, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी गौतम शंभरकर, प्रशासन अधिकारी सचिन सुब्बनवाड यांनी काम पाहिले. तर प्रत्येक केंद्रावर शांततेत मतदान पार पडावे म्हणून आष्टीचे ठाणेदार लक्ष्मण लोकरे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि गृहरक्षकांनी सेवा दिली.
समुद्रपूर नगरपंचायतीच्या १५ जागांसाठी ६७ उमेदवार निवडणूक रिंगणात असून मंगळवारी समुद्रपूर शहरातील १५ केंद्रांवरून प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले. समुद्रपूर येथे ५ हजार ७५० मतदारांपैकी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ८२ टक्के मतदारांनी मतदान केले. संवेदनशील मतदान केंद्रासह सर्वच मतदान केंद्रावर पोलिसांसह गृहरक्षकांचा चोख बंदोबस्त होता. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय महसूल अधिकारी शिल्पा सोनाले, सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून अनिल जगताप यांनी काम पाहिले. त्यांना प्रशासकीय अधिकारी पवन धुमाळे, अखिलेश सोनटक्के, हर्षल कांबळे, पवन वाटकर, विशाल ब्राह्मणकर, अनिल नासरे, नरेश वानकर, शंभरकर, काटेवार, ढाकणे, अक्षय पुनवटकर, अंकुश अडकीने, उमेश फटिंग, श्रीकांत आगलावे, भावना ढाकरे, विजय घुगसे, मंगेश मेंडूले, विजय सरोदे आदींनी सहकार्य केले.
सेलू नगरपंचायतीच्या १३ जागांसाठी तब्बल ६५ उमेदवार आपले राजकीय भविष्य आजमावत असून, मंगळवारी सेलू शहरातील १४ केंद्रांवरून प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले. सेलू येथे ८ हजार ९६० मतदारांपैकी ६ हजार ६७९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. येथे मतदानाची सरासरी ७४.५४ इतकी राहिली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे यांनी काम पाहिले. विशेष म्हणजे, शहरातील प्रत्येक मतदान केंद्रावर कोविड नियमांचेही पालन करण्यात आले.
कारंजा नगरपंचायतीच्या १३ जागांसाठी एकूण ३९ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, मंगळवारी कारंजा शहरातील एकूण १३  केंद्रांवरून ७८.४० टक्के मतदारांनी मतदान केले. मंगळवारी तेराही मतदान केंद्रांवरून शांततेत मतदान पार पडले. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत कारंजा येथे ७ हजार ६५६ मतदारांपैकी ५ हजार ९८४ मतदारांनी मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावले. यात ३ हजार ११६ पुरुष, तर २ हजार ८६८ महिला मतदारांचा समावेश आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय महसूल अधिकारी हरीष धार्मिक तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नायब तहसीलदार किशोर साळवे यांनी काम पाहिले.

सुरुवातीच्या दोन तासांत ९.७८ टक्के मतदारांनी बजावले राष्ट्रीय कर्तव्य
-   जिल्ह्यातील सेलू, समुद्रपूर, आष्टी व कारंजा या चार नगरपंचायतींच्या एकूण ५४ जागांसाठी मंगळवारी प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत संपूर्ण मतदान प्रक्रिया पार पडली असली, तरी सुरुवातीच्या दोन तासांत चारही नगरपंचायतींतील ९.७८ टक्के मतदारांनी मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावले. सकाळी ७.३० ते ९.३० या काळात कारंजा येथे ८१२, आष्टी येथे ८१०, सेलू येथे ६२८, तर समुद्रपूर येथे ५७० मतदारांनी मतदान केंद्रांवर येत प्रत्यक्ष मतदान केले. 

२२३ उमेदवारांचे भविष्य ईव्हीएममध्ये सील
-   कारंजा येथे १३ जागांसाठी ३९ उमेदवार, आष्टी येथे १३ जागांसाठी ५२ उमेदवार, सेलू येथे १३ जागांसाठी ६५ उमेदवार, तर समुद्रपूर येथे १५ जागांसाठी ६७ उमेदवार राजकीय भविष्य आजमावत आहेत. मंगळवारी प्रत्यक्ष मतदानाअंती या चारही नगरपंचायतीमधील २२३ उमेदवारांचे राजकीय भविष्य ईव्हीएममध्ये सील झाले आहे.

१९ जानेवारीला होणार मतमोजणी
नगरपंचायतीच्या इतर मागासवर्गीय प्रवर्गाच्या जागा खुल्या प्रवर्गातून भरल्या जाणार आहेत. त्यासाठी १८ जानेवारीला प्रत्यक्ष मतदान होणार असून, २१ डिसेंबरला झालेले मतदान व १८ जानेवारीला होणाऱ्या मतदानाची मतमोजणी एकाच दिवशी म्हणजे १९ जानेवारीला होणार आहे. मतमोजणीअंतीच कोण विजयी होतो ते स्पष्ट होणार आहे.

दुपारी वाढला वेग
-   मागील काही दिवसांपासून जिल्ह्याच्या तापमानात झपाट्याने घट येत आहे. सध्या जिल्ह्याचे किमान तापमान ९ पेक्षा कमी वर आले असून, मंगळवारी दुपारी जिल्ह्यातील चारही नगरपंचायत क्षेत्रात प्रत्यक्ष मतदानाला चांगलाच वेग आला होता. दुपारी १.३० वाजेपर्यंत कारंजा येथे ३,८१६, आष्टी येथे २,८३९, सेलू येथे ३,३३५ तर समुद्रपूर येथे २,५३७ मतदारांनी मतदान केंद्रांवर येत मतदान केले.

सकाळी ११.३० वाजता मतदाराचा टक्का पोहोचला २३.९४ वर
-    जसजसा सूर्य डोक्यावर येत होता तस तसा चारही नगरपंचायतींच्या मतदानाचा टक्का वाढत गेला. सकाळी ११.३० वाजेपर्यंत चारही नगरपंचायतींच्या ५४ जागांसाठी २३.९४ टक्के मतदारांनी मतदान केले. सकाळी ११.३० पर्यंत कारंजा येथे २,०९८, आष्टी येथे १,७४७, सेलू येथे १,६२५ तर समुद्रपूर येथे १,४०० मतदारांनी प्रत्यक्ष मतदान केले.

 

Web Title: 76.46 per cent voters performed national duty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.