७.६८ लाख रुग्णांनी घेतला अद्ययावत सेवेचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:43 AM2017-09-25T00:43:18+5:302017-09-25T00:43:57+5:30
समाजातील दुर्बल घटकांना अत्यल्प मोबदल्यात अद्यावत आरोग्य सेवा देण्याकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात अनेक नवनवीन मशीन्स उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : समाजातील दुर्बल घटकांना अत्यल्प मोबदल्यात अद्यावत आरोग्य सेवा देण्याकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात अनेक नवनवीन मशीन्स उपलब्ध करण्यात आल्या आहेत. गत तीन वर्षांत रुग्णालयातून ७.६८ लाख रुग्णांनी अद्यावत आरोग्य सेवेचा लाभ घेतला आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात गरोदर माता, समाजातील आर्थिक दुर्बल घटक आदींना नि:शुल्क आरोग्य सेवा दिली जाते. तर इतर नागरिकांना अतिशय अल्प मोबदला घेऊन आरोग्य सेवा पुरविली जाते. इतर जिल्ह्याच्या तुलनेत गत वर्षी वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालय गरजुंना चांगली आरोग्य सेवा देण्यात द्वितीय क्रमांकावर राहिला. त्यावेळी जिल्हा शल्य चिकित्सकांना शासनाच्यावतीने पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुरस्कार मिळाल्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी नव्या जोमाने यंदा प्रथम पुरस्कार पदरी पाडून घेण्यासाठी व जिल्ह्यातील प्रत्येक गरजुला चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
जिल्हा सामान्य रुग्णालयात नव्याने लावण्यात आलेल्या आधुनिक मशीन्स या रुग्णांसाठी फायद्याच्या ठरत असून अजुन काही नवीन मशीन लावण्याची गरज आहे. सन २०१५-१६ मध्ये ३ लाख १५ हजार ४५, सन २०१६-१७ मध्ये ३ लाख ४४ हजार ७५१ व सन २०१७-१८ जुलै अखेरपर्यंत १ लाख ८ हजार ८९६ रुग्णांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोग्य सेवेचा लाभ घेतला.
अपुºया मनुष्यबळामुळे अनेक अडचणी
जिल्हा सामान्य रुग्णालयात मंजूर विविध पदांपैकी अनेक पदे रिक्त आहेत. अपुºया मनुष्य बळामुळे बहुदा एकाच अधिकारी व कर्मचाºयाच्या खांद्यावर विविध पदांची जबाबदारी येते. परिणामी, अधिकारी व कर्मचाºयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे वास्तव आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात वर्ग एकची १४ पदे, वर्ग दोनची पाच, वर्ग तीनची ५६ तर वर्ग चारची ३२ पदे रिक्त असल्याचे सांगण्यात येते. त्वरित ही पदे भरल्या गेल्यास याचा निश्चितच रुग्णांना फायदा होणार आहे.
सात हजार महिलांची झाली प्रसुती
वर्धा शहरानजीक दोन मोठे वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पीटल असतानाही तीन वर्षात सात हजाराच्यावर महिलांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाºयांवर विश्वास ठेऊन आपली प्रसुती येथे करून घेतली. सन २०१५-१६ मध्ये ३ हजार २३३, सन २०१६-१७ मध्ये २ हजार ९४८ व सन २०१७-१८ जुलै अखेरपर्यंत ८२९ महिलांनी प्रसुती करून घेतली.
गर्भवतींना दिल्या जातो विविध योजनांचा लाभ
गर्भवती महिलांना जननी सुरक्षा योजनेसह शासनाच्या विविध योजनांचा लाभ जिल्हा सामान्य रुग्णालयात दिला जातो. इतकेच नव्हे तर गर्भवती महिलेला घरुन दवाखान्यात आणण्यासाठी व दवाखान्यातून घरी नेण्यासाठी नि:शुल्क रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाते.