जिल्ह्यातील आठ शहीद स्मारकांसाठी ७७ लाख
By Admin | Published: March 18, 2017 01:05 AM2017-03-18T01:05:02+5:302017-03-18T01:05:02+5:30
स्वातंत्र्यलढ्यात आहुती देणाऱ्या शहिदांच्या स्मृती तेवत राहाव्या याकरिता जिल्ह्यात शहीद स्मारक उभारण्यात आले.
निधीतून होणार डागडुजी व रंगरंगोटी
वर्धा : स्वातंत्र्यलढ्यात आहुती देणाऱ्या शहिदांच्या स्मृती तेवत राहाव्या याकरिता जिल्ह्यात शहीद स्मारक उभारण्यात आले. शासकीय उदासिनतेमुळे मात्र या शहीद स्मारकांची दैना झाली. त्यांच्या डागडुजीकरिता शासकीय तिजोरीतून रक्कम मिळत नसल्याने शहीद स्मारकेच शहीद होण्याच्या मार्गावर आली होती. याकडे वेळोवेळी शासनाचे लक्ष वेधण्यात आले. शहीद स्मारकाची ही दुरवस्था दूर करण्याकरिता अखेर शासनाच्यावतीने निधी देण्यात आला. यात वर्धा जिल्ह्याला तब्बल ७७ लाख रुपये मंजूर झाले असून या निधीतून जिल्ह्यातील आठही शहीद स्मारकांचे रूपडे पालटणार आहे.
वर्धा जिल्हा अनेक ऐतिहासिक लढ्याची साक्ष देणारा आहे. शिवाय महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम येथील आश्रमातून अनेक लढ्याची रूपरेषा आखण्यात आली. या काळात येथे अनेक स्वातंत्र्यसंग्राम सेनानी येत होते. त्यातील काही महात्मा गांधी यांच्यासोबत परत गेले तर काहींनी बापुंचा लढा वर्धेतूनच सुरू ठेवला. त्यांच्या निधनानंतर त्यांची आठवण म्हणनूही वर्धेत शहीद स्मारके तयार करण्यात आली. स्वातंत्र्याकरिता आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या या शहिदांना नमन करण्याकरिता असलेल्या या स्मारकाच्या देखभालीकडे मात्र शासनाचे दुर्लक्ष झाले. अनेक स्मारके खंडर झाली. या स्मारकाच्या नावावर शहिदांची अवहेलना होत असल्याच्या अनेक तक्रारी झाल्या. या स्मारकांची दुरूस्ती करण्याकरिता अनेकवेळा मागणी झाली.
ही मागणी अखेर पूर्णत्त्वास आली असून जिल्ह्याकरिता ७७ लाख रुपये मंजूर झाले आहे. मंजूर रकमेनुसार बांधकाम विभागाच्यावतीने आठही स्मारकांच्या नुतनीकरणाचा आराखडा तयार करणे सुरू आहे. यात स्मारकांची झालेली तुटफूट, तुटलेले छप्पर यासह रंगरंगोटी करण्यात येणार आहे. या कामाकरिता आवश्यक सूचना जिल्हाधिकारी कार्यालयातून रवाना झाल्या आहेत. प्रत्यक्ष कामाला महिन्याभऱ्यात प्रारंभ होणार असल्याची माहिती आहे.
वर्धेत सामाजिक संस्थांनी स्वीकारले स्मारकांचे दायित्व
वर्धा : वर्धेत असलेल्या शहीद स्मारकांचे दायीत्व काही सामाजिक संस्थांनी स्वीकारले होते. यात डॉ. आंबेडकर चौकातील स्मारक लायन्य क्लब आणि वरूड येथील स्मारकाचे पालकत्व निसर्ग सेवा समितीने स्वीकरीले होते. या दोन्ही सस्थांकडून सध्या या स्मारकांची देखभाल सुरू असल्याने त्यांची स्थिती उत्तम आहे. मात्र, जिल्ह्यातील इतर स्मारकांची स्थिती दयनीय झाली आहे. यामुळे त्यांची दुरूस्ती करून रंगरंगोटी करण्याची गरज निर्माण झाली आहे.(प्रतिनिधी)