७७,०८३ ग्राहकांची होणार बत्ती गूल
By Admin | Published: January 2, 2017 12:04 AM2017-01-02T00:04:27+5:302017-01-02T00:04:27+5:30
विजेचा वापर करून आलेले देयक भरण्यास कुचराई करणाऱ्या ग्राहकांवर वीज जोडणी कापण्याचा बडगा महावितरणने उगारला आहे.
१२ कोटी रूपयांची थकबाकी : आतापर्यंत ६८८ जणांची कापली वीज
रूपेश खैरी वर्धा
विजेचा वापर करून आलेले देयक भरण्यास कुचराई करणाऱ्या ग्राहकांवर वीज जोडणी कापण्याचा बडगा महावितरणने उगारला आहे. थकबाकी असलेल्या ग्राहकांची वीज कापण्याचा निर्णय झाला असून तशी मोहीम सुरू झाली आहे. यात वर्धा जिल्ह्यात १२ कोटी ६ लाख २८ हजार रुपयांच्या थकबाकीपोटी तब्बल ७७ हजार ८३ ग्राहकांची बत्ती गुल होणार आहे. या मोहिमेत थकबाकीदार असलेल्या घरगुती, व्यावसायिक, कारखानदार व शासकीय कार्यालयाचा समावेश आहे.
मोहीम सुरू झाली त्या काळापासून आतापर्यंत ६८८ ग्राहकांची वीज कापण्यात आली आहे. यात ५९७ ग्राहकांची तात्पूरती तर ९१ ग्राहकांची वीज जोडणी कायमस्वरूपी कापण्यात आली आहे. थकबाकी असलेल्या ग्राहकांच्या घरी जात कंपनीच्यावतीने त्यांच्यावर असलेली थकबाकी भरण्याची मागणी करण्यात येते. जर ग्राहकाने थकबाकीची रक्कम भरली तर त्या घरातील वीज कायम ठेवण्यात येत आहे. जोपर्यंत असलेली थकबाकी पूर्ण वसूल होत नाही तोपर्यंत ही मोहीम अशीच सुरू राहणार आहे.
थकबाकीदार ग्राहकांकरिता अनेक योजना राबविण्यात आल्या. त्या योजनेचा लाभ घेण्याकरिता त्यांना सूचनाही देण्यात आल्या. असलेली थकबाकी भरण्यासंदर्भात विभागाच्यावतीने नोटीसही बजावल्या. असे असतानाही या ग्राहकांकडून वसुली संदर्भात कुठलीही कार्यवाही झाली नाही. उलट त्यांच्याकडील थकबाकी तशीच आहे. या थकबाकीमुळे महावितरणचे नुकसान होत असल्याने अखेर थकबाकी असलेल्या ग्राहकांची वीज कापण्याचा निर्णय झाला. या निर्णयानुसार जिल्ह्यातील तीनही झोन आणि वर्धा सर्कलमध्ये ही कारवाई सुरू झाली आहे.
पाणी पुरवठा व स्ट्रीट लाईटच्या देयकापोटी थकले १७.९८ कोटी
नागरी सुविधेत मोडत असलेल्या पाणी पुरवठा व स्ट्रीट लाईटचे देयक भरण्याकडे संबंधीत विभागाकडून दुर्लक्ष होत आहे. जिल्ह्यात कार्यरत असलेल्या एकूण २ हजार २२९ योजनांवर आतापर्यंत देयकापोटी १७.९८ कोटी रुपये थकले आहे. यात १ हजार २७७ ग्राहक स्ट्रीट लाईट योजनेशी तर ९५२ ग्राहक पाणी पुरवठा योजनेशी निगडीत आहे. या दोन्ही बाबी नागरी सुविधेत येत असल्याने त्यांची वीज कापणे विभागाला सहज शक्य होत नाही. या योजनेची थकबाकी थेट राज्यस्तरावरून भरण्यात येत आहे. याची माहिती देताच ही थकबाकी प्राप्त होत असल्याचे वीज कंपनीकडून सांगण्यात आले आहे. या थकबाकीची माहिती त्या विभागाला देण्यात आली आहे.
थकबाकीमुक्ती योजनेला अत्यल्प प्रतिसाद
गत महिन्यात महावितरणच्यावतीने थकबाकी असलेल्या ग्राहकांकरिता थकबाकी मुक्ती योजना अंमलात आणली होती. या योजनेत ग्राहकांना काही नियमानुसार मूभा देण्यात येत होती. वर्धा जिल्ह्यात सुमारे ५७ हजार ८३८ ग्राहकांकडे २० कोटी ७४ लाख रुपये थकले होते. या ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळणार होता. यामुळे त्यांच्याकडून ही थकबाकी भरण्यासंदर्भात हालचाली होणे अपेक्षित होते; मात्र तसे झाले नाही. या योजनेला जिल्ह्यात अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे.