वर्ध्यात दारूबंदी नावालाच; बनावट दारूच्या घोटाने महिनाभरात आठ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2022 04:32 PM2022-04-30T16:32:06+5:302022-04-30T16:47:47+5:30
मागील वर्षभरात पोलीस विभागाने दोन कोटी रुपयांवर दारूसाठा जप्त करून तब्बल साडेतीन हजार दारू विक्रेत्यांना अटक केल्याची माहिती आहे.
वर्धा : वर्धा जिल्ह्यात १९७४ मध्ये दारूबंदी झाली असली तरीही आजघडीला मोठ्या प्रमाणात दारूची विक्री वर्धा जिल्ह्यातच सुरू आहे. यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. विशेष म्हणजे वर्धा जिल्ह्या बनावट दारूमुळे गेल्या महिनाभरात आठ ते नऊ जणांची प्रकृती बिघडून त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे एक तर दारू खुली करा, अन्यथा कायमस्वरूपी तोडगा काढून दारू हद्दपार करा, अशी मागणी आता नागरिकांतून जोर धरू लागली आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूची विक्री होते. वर्धा जिल्ह्याला महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांचा वारसा लाभल्याने १९७४ मध्ये जिल्हा दारूबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हापासून वर्धा जिल्हा ‘ड्राय डिस्ट्रिक्ट’ म्हणून ओळखला जातो. मात्र, आजघडीला असे वास्तव आहे की, याच जिल्ह्यात बंदी नसलेल्या जिल्ह्यापेक्षा जास्त प्रामाणात म्हणजेच कोट्यवधी रुपयांच्या दारूची उलाढाल होते. हेही मात्र तितकेच खरे.
मागील वर्षभरात पोलीस विभागाने दोन कोटी रुपयांवर दारूसाठा जप्त करून तब्बल साडेतीन हजार दारू विक्रेत्यांना अटक केल्याची माहिती आहे. इतकेच नव्हे, तर दारूची वाहतूक करणारी वाहनंही जप्त करण्यात आली आहेत. शहरासह जिल्ह्यात अगदी ठिकठिकाणी दारूची होणारी अवैध विक्री पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे, हे मात्र तितकेच खरे.
बनावट दारूचा कहर
जिल्ह्यात दारूबंदी असल्याने बनावट दारूचे विषही मोठ्या प्रमाणात विकले जाते. वर्ध्यात मध्य प्रदेश, दिल्ली आदी राज्यातील दारू विकली जात असल्याने मिळणाऱ्या दारूच्या बाटलीच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वर्ध्यात मोठ्या प्रमाणात बनावट दारूची सर्रास होणारी विक्री पाहता नागरिकांच्या आरोग्यावरही याचा परिणाम होत असल्याचे चित्र आहे.
पोलिसांचेही हात ओलेच...
जिल्ह्यात दारू विक्री रोखण्यासाठी विविध महिला मंडळांच्या रणरागिणींनी रस्त्यावर उतरून आंदोलने केली, वारंवार पोलीस विभागाकडे निवेदने देत पाठपुरावाही करण्यात आला. मात्र, तरीदेखील जिल्ह्यात दारूबंदी केवळ नावालाच उरल्याचे दिसून येत आहे. याला काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कारणीभूत असल्याने अख्ख्या पोलीस विभागाची प्रतिमा मलिन होत चालली आहे. त्यामुळे याकडेही लक्ष देत दारूबंदी विशेष पोलीस ठाण्याची निर्मिती करण्याची मागणी केली जात आहे.