८ लाखांचा ऐवज लंपास
By admin | Published: May 23, 2017 01:01 AM2017-05-23T01:01:42+5:302017-05-23T01:01:42+5:30
घरी कुणी नसल्याची संधी साधत चोरट्याने शहरातील एका व्यावसायिकाच्या घरी भर दिवसा चोरी केली.
कारंजा शहरात भरदिवसा घरफोडीने खळबळ
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : घरी कुणी नसल्याची संधी साधत चोरट्याने शहरातील एका व्यावसायिकाच्या घरी भर दिवसा चोरी केली. या चोरीत चोरट्याने घरातून सोन्या चांदीचा ऐवज व रोख रक्कम, असा एकूण ८ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना सोमवारी दुपारी येथील वॉर्ड क्रमांक १६ मध्ये घडली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर त्यांनी घटनास्थळ गाठत पाहणी करून घटनेची नोंद केली.
पोलिसांना चोरीत चोरट्यांचा कुठलाही सुगावा लागला नाही. यामुळे चोरी करणारे शहरातील आहेत अथवा बाहेर जिल्ह्यातील याचा शोध पोलीस घेत आहेत. घटनास्थळी ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले; मात्र त्यांच्या हातीही काहीच आले नाही. रोख रकमेसह सोन्याचा ऐवज लांबविलेल्या या घटननेने शहरात खळबळ माजली.
पोलीस सुत्रानुसार, शहरातील ब्लास्टिंग, क्रेनचे व्यावसायिक अन्नराज गायकवाड हे त्यांच्या कुटुंबियांसह विवाह समारंभाकरिता गेले होते. आज दुपारी त्यांच्या घरी कुणी नव्हते. याची संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घरावर हात साफ केला. गायकवाड दुपारी घरी आले असता चोरी झाल्याचे समोर आले. त्यांनी घरात पाहणी केली असता घराच्या मागचे दार तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी लाकडी कपाटातून ३ तोळे वजनाची सोन्याची पोत, २ तोळ वजनाचा नेकलेस, अडीच तोळ्यांची चैन, २ तोळ्यांच्या तीन अंगठी, २ तोळ्यांच्या बांगडया यासह १ तोळे वजनाचे सोन्याचे कानातील टॉप आदी दागिन्यांसह १ लाख १० हजार रुपये असे साहित्य लंपास केल्याचे निदर्शनास आले. त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली असता सायंकाळी पोलीस उपनिरीक्षक प्रदीपकुमार राठोड, अमोल बरडे, व मनोज नामक पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून घटनेची नोंद केली आहे.
के्रनच्या विक्रीची रक्कमही चोरट्याने पळविली
गायकवाड यांचा क्रेनचा व्यवसाय होता. यात त्यांनी त्यांच्या मालकीच्या क्रेनची विक्री रविवारी केली. याची रक्कम घरीच होती. चोरट्याने ती रक्कमही लंपास केली.
या चोरीत चोरट्याने गायकवाड यांच्या घरून तब्बल १७ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले.
पोलिसांनी घटनास्थळ गाठत पाहणी केली; मात्र त्यांच्या हाती कुठलाही सुगावा लागला नाही. हा चोर पाहणीतीलच असावा असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.