८० टक्के पेरण्या आटोपल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 11:20 PM2018-07-04T23:20:38+5:302018-07-04T23:23:29+5:30

जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या पावसादरम्यान जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी यंदा पेरणीची कामे आटोपली. तर बहूतांश शेतकऱ्यांनी त्याच महिन्याच्या अखेरीस झालेल्या जोरदार पावसादरम्यान विविध पिकांची पेरणी केली.

80 percent of sowing has been done | ८० टक्के पेरण्या आटोपल्या

८० टक्के पेरण्या आटोपल्या

Next
ठळक मुद्देकपाशीच्या लागवडीकडे पाठ : सोयाबीन लागवडीला शेतकऱ्यांची पसंती

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या पावसादरम्यान जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी यंदा पेरणीची कामे आटोपली. तर बहूतांश शेतकऱ्यांनी त्याच महिन्याच्या अखेरीस झालेल्या जोरदार पावसादरम्यान विविध पिकांची पेरणी केली. जिल्ह्यात आतापर्यंत पेरणीची कामे ८० टक्के पूर्ण झाली असून अनेक शेतकऱ्यांनी यंदा कपाशीच्या लागवडीकडे पाठ करीत सोयाबीनला पसंती दिल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
गत वर्षी कपाशी पिकावर मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. गुलाबी बोंडअळीने कपाशी उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने यंदा घट नाही; पण ऐरवी लागवड होणारी कपाशीची शेतकरी पेरणी करतील असा अंदाज कृषी विभागाकडून वर्तविला जात होता. जोरदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा असतानाच जून महिन्याच्या शेवटी झालेल्या पावसादरम्यान अनेक शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामांना गती दिली. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात ८० टक्के पेरणीची कामे पूर्ण झाल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. यात तुरीची ४६ हजार ३९ हेक्टरवर, सोयाबीन ९० हजार ८३९ हेक्टरवर तर १ लाख ९८ हजार ५२६ हेक्टरवर कपाशीची लागवड झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.
तर ४१० हेक्टरवर ज्वारी, ६२ हेक्टरवर मका, ११७.८ हेक्टरवर मुग, १४९.४ हेक्टरवर उडीद, ५४.०७ हेक्टरवर भुईमुंगाची लागवड करण्यात आली आहे. जून महिन्यात झालेल्या पावसादरम्यान ८० टक्के शेतकऱ्यांनी पेरणीची कामे आटोपली असली तरी २० टक्के शेतकऱ्यांना अजूनही पेरणी योग्य पावसाची प्रतीक्षाच आहे. यंदाच्या वर्षी वरुणराजा शेतकऱ्यांच्या वेळोवेळी अपेक्षा भंग करीत असल्याने शेती करावी की शेतजमिन कडीक ठेवायची असाच प्रश्न सध्या शेतकऱ्यांना सतावत आहे. ज्या शेतकऱ्यांनी जुन महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात विविध पिकांची पेरणी केली. त्यांच्या शेतातील अंकुरलेले पीक पाण्याअभावी करपत असताना जून महिन्याच्या अखेरीस झालेला पाऊस पिकांना नवसंजीवणीच देणारा ठरला. येत्या काही दिवसात जोरदार पाऊस व्हावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांसह नागरिकांना आहे.
उत्पन्नावर परिणाम होण्याची भीती
सध्याच्या विज्ञान युगात निसर्गावर अवलंबन शेती करणे म्हणजे जुगार खेळण्यागतच असल्याचे शेतकरी सांगतात. ज्यांनी जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दुबार पेरणीची मोठी ‘रिस्क’ घेत विविध पिकांची पेरणी केली. त्यांच्या शेतातील पिकांना जूनच्या अखेरीस झालेला पाऊस नवसंजीवनी देणाराच ठरला. याच काळात जिल्ह्यातील बहूतांश शेतकऱ्यांनी विविध पिकांची पेरणी केली. सध्या स्थितीत जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पेरणी करण्यात आलेल्या पिकाची बऱ्यापैकी झाली आहे तर जूनच्या शेवटात लागवड केलेले पीक सदर पिकांच्या तुलनेत वाढ होण्यामध्ये मागे असल्याने उत्पादनात घट होण्याची भीती आहे.
मजूरही सहज मिळेना
जून महिन्याच्या अखेरीस जोरदार बरसल्यानंतर पावसाने थोडी उसंत घेतली आहे. उघाड मिळाल्याने सध्या निंदण, डवरण, खत देणे आदी कामे झटपट पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांकडून प्राधान्य दिले जात आहे. परंतु, सदर कामे वेळीच पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना सहज मजुरही मिळत नसल्याने गावाबाहेरून शेतमजूर आणून ही कामे पुर्ण केली जात असल्याचे दिसून येत आहे.
खतांच्या दरात वाढ
विविध पिकांची वाढ जोपाने व्हावी या उद्देशाने शेतकरी पिकांना रासायनिक खत देतात. परंतु, सध्यास्थितीत विविध खतांच्या दरात कमीत कमी ५० ते जास्तीत जास्त १०० रुपयांनी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना चांगलाच आर्थिक फटकाच सहन करावा लागत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांना यंदाच्यावर्षी शासनाने सवलतीच्या दरात खत उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी हवालदिल शेतकऱ्यांची आहे.

Web Title: 80 percent of sowing has been done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.