महाराजस्व अभियानात ८,१७० प्रमाणपत्र वितरित
By admin | Published: September 10, 2015 02:45 AM2015-09-10T02:45:15+5:302015-09-10T02:45:15+5:30
महाराष्ट्र शासनाच्या महाराजस्व अभियानांतर्गत जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार महसूल महाअदालत घेण्यात आली.
महाअदालतीत प्रलंबित प्रकरणांचा केला निपटारा
नाचणगाव : महाराष्ट्र शासनाच्या महाराजस्व अभियानांतर्गत जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार महसूल महाअदालत घेण्यात आली. तहसील कार्यालय देवळी यांच्यावतीने रंगलाल केजडीवाल हायस्कूल, पुलगाव येथे सोमवारी पार पडलेल्या महाअदालतीत प्रलंबीत प्रकरणांचा निपटारा केला. तसेच शिबिरातून ८ हजार १७० प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
यापूर्वी आपसी वाटणी प्रकरणाचा निपटारा करताना शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. त्यात अधिक खर्च येत असत. शेतकऱ्यांना होणारा हा मनस्ताप कमी करण्यासाठी शासनाकडून महत्त्वाकांक्षी पाऊल उचलण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून ४५ लाभार्थ्यांना देवळीच्या तहसीलदार तेजस्वीनी जाधव यांच्या हस्ते तत्सम आदेश वितरीत करण्यात आले.
यावेळी घेण्यात आलेल्या शिबिरात उत्पन्नाचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र, शपथपत्र, चतु:सिमा प्रमाणपत्र, तलाठी उत्पन्न, हैसीयत प्रमाणपत्र, फेरफार पंजी, राशनकार्ड अशी एकूण ८ हजार १७० अर्ज, प्रकरणे यावेळी निकालात काढण्यात आली. महसुल विभागातर्फे देण्यात येणाऱ्या विविध प्रमाणपत्रे मिळण्यास नागरिक व विद्यार्थ्यांना विलंब होत होता. त्यांचा होणारा वेळेचा, श्रमाचा, पैशाचा अपव्यय टाळण्यासाठी याशिवाय शासकीय कामात नियमितता, पारदर्शकता आणुन लोकाभिमुख प्रशासन बणविण्यासाठी हे शिबिर घेण्यात आले होते. यावेळी कांचन कोटांगळे, चंद्रकला डोईफोडे, सुनील ब्राह्मणकर, माजी जि.प. सदस्य दिलीप अग्रवाल, विश्वस्त ओमप्रकाश केजडीवाल, नायब तहसीलदार सोनवणे आदी उपस्थित होते.(वार्ताहर)