वर्धा जिल्ह्यात झाली ८५ प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2022 05:00 AM2022-03-02T05:00:00+5:302022-03-02T05:00:07+5:30
जिल्ह्यात ८५ पक्षी प्रजातींच्या नोंदीमध्ये प्रामुख्याने जागतिक आययूसीएन संस्थेद्वारे प्रकाशित धोक्यात असलेल्या प्रजातींच्या लाल यादीतील असुरक्षित स्थितीत असलेला नदी सुरय तसेच संकट समीप असलेला मोठा कारवानक, पांढऱ्या मानेचा करकोचा, रंगीत करकोचा या प्रजातींची नोंद झाली. भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर, महाराष्ट्राचा राज्य पक्षी पिवळ्या पायाची हरोळी व वर्धेचा शहर पक्षी भारतीय नीलपंख निरीक्षणादरम्यान आढळले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पक्षी निरीक्षण, गणना आणि नोंदी करण्याचा ‘ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंट’ हा उपक्रम १८ ते २१ फेब्रुवारी या काळात राबविण्यात आला. या उपक्रमामध्ये वर्धा जिल्ह्यातील पक्षीप्रेमींनी पक्षी निरीक्षणात तब्बल ८५ प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद घेतली आहे. जिल्ह्यात विविध अधिवासांवर पक्षीमित्रांनी व्यक्तिगतकरीत्या व समूहाने पक्षी निरीक्षण करून या नोंदी घेतल्या असून पक्षी अभ्यासक राहुल वकारे यांनी सर्वाधिक म्हणजे ५१ पक्ष्यांच्या नोंदी घेतल्या आहेत.
जिल्ह्यात ८५ पक्षी प्रजातींच्या नोंदीमध्ये प्रामुख्याने जागतिक आययूसीएन संस्थेद्वारे प्रकाशित धोक्यात असलेल्या प्रजातींच्या लाल यादीतील असुरक्षित स्थितीत असलेला नदी सुरय तसेच संकट समीप असलेला मोठा कारवानक, पांढऱ्या मानेचा करकोचा, रंगीत करकोचा या प्रजातींची नोंद झाली. भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर, महाराष्ट्राचा राज्य पक्षी पिवळ्या पायाची हरोळी व वर्धेचा शहर पक्षी भारतीय नीलपंख निरीक्षणादरम्यान आढळले. हिवाळी स्थलांतरित पक्ष्यांमध्ये राजहंस, चक्रवाक, सामान्य क्रौंच, ह्युमचा पर्णवटवट्या, काळा थिरथिरा, कारुण्य कोकीळ, सामान्य गप्पीदास, छोटा टिलवा हे पक्षी आढळले असल्याचे सांगण्यात आले आहे.
राज्यात वर्धा १९ व्या स्थानी
ई-बर्ड या संकेतस्थळावर चार दिवसानंतरच्या नोंदीनुसार संपूर्ण जगभरातून ३,०१,८९१ पक्षी सूचींमध्ये ७,०९९ पक्षी प्रजातींची नोंद करण्यात आली. यात भारत १०२२ पक्षी प्रजातींची नोंद करीत जागतिक स्थरावर भारत तिसऱ्या स्थानावर आहे. तर भारतात महाराष्ट्र राज्याने ३७१ पक्षी प्रजातींची नोंद करीत पाचवे स्थान पटकावले आहे. शिवाय महाराष्ट्रातून वर्धेचे स्थान १९ वे आहे. अंतिम अहवाल प्रदर्शित झाल्यावर वरील संख्येमध्ये थोडा बदल संभवतो. २०२२ च्या ‘ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंट’मध्ये राहुल वकारे, सफल पाटील, अमेय ठाकरे, डॉ. चेतना उगले, गणराज गल्हाट, राहुल हालदे, शीतल दाते, उत्कर्षा टेंभारे, प्रफुल्ल थोटे, अश्विनी मंगरुळकर, नीलेश पाणबुडे, वैभव पोहणकर, अनिल सावरकर, महेश महाजन, सागर भेंडे हे पक्षी निरीक्षक सहभागी झाले होते.