वर्धेतील ८६ इमारती धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 10:54 PM2018-05-28T22:54:39+5:302018-05-28T22:54:57+5:30
पावसाळ्यादरम्यान शिकस्त इमारती कोसळून कुठली दुर्घटना घडू नये म्हणून जिल्हा प्रशासनाच्यावतीने कार्यवाही करण्यात येते. यात वर्धा नगर परिषदेच्यावतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात शहरात तब्बल ८६ इमारती धोकादायक असल्याचे समोर आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पावसाळ्यादरम्यान शिकस्त इमारती कोसळून कुठली दुर्घटना घडू नये म्हणून जिल्हा प्रशासनाच्यावतीने कार्यवाही करण्यात येते. यात वर्धा नगर परिषदेच्यावतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात शहरात तब्बल ८६ इमारती धोकादायक असल्याचे समोर आले आहे. या इमारती राहण्यायोग्य नसल्याने त्यांना पाडण्याची कार्यवाही घरमालकाने करावी, अशा आशयाची नोटीस मालकांना पालिकेच्यावतीने बजावण्यात आली आहे.
वर्धा शहरात अशा शिकस्त इमारतींच्या संख्येत यंदा वाढ झाल्याचे दिसून आले आहे. गत वर्षी जिल्ह्यात अशा एकूण ७५ इमारती होत्या. यात आता वाढ झाली असून हा आकडा ८६ वर पोहोचला आहे. या इमारत मालकांना पालिकेच्यावतीने नोटीसी बजावण्यात येत असल्या तरी मालकांकडून कोणतीही कार्यवाही करण्यात येत नसल्याचे या वाढत्या आकड्यांवरून दिसत आहे. गत वर्षी पालिका प्रशासनाकडून या इमारतींच्या मालकांनाही नोटीसी बजावण्यात आल्या होत्या. त्याच नोटीसी पुन्हा यंदाच्या सत्रात बजावण्यात आल्या आहेत. या इमारतींचा सर्व्हे सुरूच आहे.
या नोटीसींवर अशा इमारत मालकांनी कार्यवाही करणे गरजेचे असताना तसे होताना दिसत नाही. वर्धेत मुख्य बाजारासह, महादेवपुरा, रामनगर, तुकाराम वॉर्ड, गोंड प्लॉट या भागातील अनेक इमारती शिकस्त झाल्या आहेत. त्या इमारती पाडण्याची कार्यवाही मालकांनी करणे गरजेचे आहे. याकडे दुर्लक्ष झाल्यास पावसाळ्याच्या दिवसात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे घरमालकांनी वेळीच याचा विचार करण्याची गरज वर्तविली जात आहे.
एका घरमालकाने नोटीसवर केली अंमलबजावणी
नगर परिषदेकडून बजावण्यात आलेल्या नोटीसवर महादेवपुरा येथील एका घरमालकाने कार्यवाही केल्याचे दिसून आले. येथे एका इमारतीत राहणाऱ्या भाडेकरूची इमारत शिकस्त झाली होती. ती इमारत पाडण्याची कार्यवाही करण्यात आली. ही कार्यवाही पोलीस बंदोबस्तात करण्यात आली; मात्र भाडेकरूकडून बराच वेळ गोंधळ घालण्यात आला होता.
म्हाडाची इमारतही शिकस्त
शहरातील लहानुजीनगर परिसरात असलेली म्हाडाची इमारतही शिकस्त झाली आहे. असे असताना या इमारतीत अनेक कुटूंब वास्तव्यास आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.