‘त्या’अट्टल घरफोड्याकडून ८६ हजारांचा मुद्देमाल जप्त
By Admin | Published: August 19, 2016 02:08 AM2016-08-19T02:08:31+5:302016-08-19T02:08:31+5:30
सेवाग्राम येथे अटक करण्यात आलेला अट्टल घरफोड्या ओमप्रकाश खांडवे याच्याकडून वर्धेत केलेल्या चोरीतील
वर्धेत केल्या एकूण सात घरफोड्या
वर्धा : सेवाग्राम येथे अटक करण्यात आलेला अट्टल घरफोड्या ओमप्रकाश खांडवे याच्याकडून वर्धेत केलेल्या चोरीतील ८६ हजार २६२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याने स्रेहल नगर येथील राठी यांच्या घरी केलेल्या चोरीची कबुली दिल्याने त्याला शहर पोलिसांच्या ताब्यात दिले असून २० आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
ओमप्रकाश खांडवे (२६) रा. तुळशीनगर, बुलढाणा याला मंगळवारी वर्धा ते सेवाग्राम मार्गावरील ओव्हरब्रीजच्या परिसरात अटक करण्यात आली होती. यावेळी त्याच्याजवळून एक देशी बनावटीचे ७.६५ एम.एम. पिस्टल, चार राऊंड, मोबाईल असा एकूण ६१ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. त्याच्यावर सेवाग्रात पोलिसात गुन्हा दाखल आहे.
याचा तपास सुरू असताना खांडवे याने स्रेहल नगर परिसरातील दर्शन राठी यांच्या घरी चोरी करून सोन्या चांदीचे दागीने, लॅपटॉप, मोबाईल हॅन्डसेट असा एकूण २ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. या गुन्ह्यातील एक लॅपटॉप, एक हार्ड डिस्क, लॅपटॉप बॅग, एक सोन्याची चैन अंदाजे २० ग्रॅम वजनाची असा एकूण ८६ हजार २६२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. (प्रतिनिधी)
भंडारा व गोंदियातही चोरी
खांडवे याने वर्धा शहर व सेवाग्राम परिसरात अनेक घरफोड्या केल्या आहेत. त्यासंबंधाने त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करून आतापर्यंत त्याच्याकडून सोन्या चांदीचे दागीने, मोबाईल, लॅपटॉप, एक स्विफ्ट गाडी आदी माल हस्तगत केला आहे. घरफोडीच्या सात गुन्ह्यामधून आरोपीने जामीन मिळविला होता. मात्र त्या काळापासून तो न्यायालयात हजर होत नव्हता. यामुळे त्याच्याविरोधात न्यायालयातून अटक वॉरंट सुद्धा निघालेला होता. वर्धेप्रमाणेच त्याने भंडारा येथे दोन व गोंदिया येथे एक घरफोडी केल्याची कबुली दिली.