८८ पांदण रस्त्यांची कामे पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 11:28 PM2018-03-15T23:28:21+5:302018-03-15T23:28:21+5:30
जिल्ह्यात प्रशासनाच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या पांदण रस्ते विकास योजनेची आता राज्य पातळीवर दखल घेण्यात आली आहे. ही योजना राज्याच्या विविध जिल्ह्यांत राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
अभिनय खोपडे।
ऑनलाईन लोकमत
वर्धा : जिल्ह्यात प्रशासनाच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या पांदण रस्ते विकास योजनेची आता राज्य पातळीवर दखल घेण्यात आली आहे. ही योजना राज्याच्या विविध जिल्ह्यांत राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेंतर्गत वर्धा जिल्ह्यात १४ मार्चपर्यंत ८८ पांदण रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात आली. हे कामे पूर्ण झाल्याने आता २ हजार ४६९ शेतकऱ्यांना शेतात चांगला रस्ता उपलब्ध झाला. या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याने १६२ अर्ज अद्यापही प्रलंबित आहेत.
आर्वी तालुक्यात ३६ अर्ज पांदण रस्ते कामासाठी दाखल करण्यात आले होते. त्यापैकी २७ गावांनी या कामाची रक्कम जमा केली आहे. २४ अर्ज शिल्लक असून १२ पांदण रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. सुमारे १२ हजार ५४३ मिटर कामे पूर्ण झाली आहे. ५६७ शेतकºयांना लाभ मिळाला असून ९६७ हेक्टर जमीन वाहितीखाली आली आहे. यात ११ ग्रा.पं. मधील गावांचा समावेश आहे.
आष्टी तालुक्यात ११ अर्ज या योजनेत शेतकऱ्यांनी सादर केले होते. ८ गावांनी लोकवर्गणीची रक्कम भरली, ४ अर्ज शिल्लक आहेत. ७ कामे पूर्ण झाली असून ४ हजार ५१५ मिटर क्षेत्रावर हे काम झाले आहे. एकूण १३६ शेतकºयांना योजनेचा लाभ मिळाला असून ४२५ हेक्टर जमीन लाभांकित झाली. एकूण ६ ग्रा.पं. अंतर्गत ही कामे झाली आहेत.
सेलू तालुक्यात ४८ अर्ज प्राप्त झाले व सर्व गावांनी लोकवर्गणीची रक्कम भरली. यातील ३० अर्ज जिल्हा प्रशासनाकडे प्रलंबित असून १३ पांदण रस्त्यांची कामे पूर्ण झालीत. काम झालेले एकूण क्षेत्र १७ हजार ५०० मिटर असून यामुळे १९५ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतासाठी रस्ता मिळाला आहे. पांदण रस्त्यामुळे सुमारे ३४८ हेक्टर जमीन लाभांकित झाली. हे काम १५ ग्रा.पं. अंतर्गत पूर्ण करण्यात आले.
वर्धा तालुक्यात ३९ अर्ज आले होते. सर्वच गावांनी लोकवर्गणीची रक्कम जमा केली असून ३० अर्ज प्रलंबित आहे. ६ कामे पूर्ण झाली असून ४ हजार ६०० मिटर क्षेत्रावर काम झाले आहे. ८७ शेतकऱ्यांना याचा लाभ झाला असून ९० हेक्टर जमीन पांदण रस्त्यामुळे उपलब्ध झाले. ८ ग्रा.पं. अंतर्गत हे काम पूर्णत्वास गेले.
देवळी तालुक्यात ३३ अर्ज प्राप्त झाले होते. यातील चार गावांनी लोकवर्गणीची रक्कम भरली आहे. २१ अर्ज प्रलंबित असून ९ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. हे काम ८ हजार १८१ मिटर क्षेत्रात झाले असून ५६ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लाभ मिळाला आहे. पांदण रस्त्यामुळे २१.०५ हेक्टर क्षेत्राला लाभ मिळाला आहे. हे काम ४ ग्रामपंचायती अंतर्गत पूर्ण करण्यात आले आहे.
समुद्रपूर तालुक्यात ४८ अर्ज प्राप्त झाले होते. यातील ४१ गावांनी लोकसहभागाची रक्कम भरली असून २९ कामे शिल्लक राहिली आहेत. १४ कामे पूर्ण करण्यात आली असून ती २० हजार ८४ मिटर क्षेत्रावर आहेत. या कामांचा ९४३ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळाला असून २ हजार १५९.७८ हेक्टर क्षेत्रातील जमीन लाभांकित झाली आहे. ६ ग्रा.पं. अंतर्गत हे काम पूर्णत्वास आले आहे. हिंगणघाट तालुक्यात ५१ अर्ज प्राप्त झाले. यातील २७ गावांनी लोकवर्गणीची रक्कम भरली असून २४ अर्ज शिल्लक आहेत. २७ कामे पूर्ण झाली असून १६ हजार २० मिटर क्षेत्रात काम करण्यात आले आहे. ४८५ शेतकºयांना या योजनेतून पांदण रस्त्याचा लाभ मिळालेला असून ९२४.७५ हेक्टर क्षेत्र पांदण रस्त्यांमुळे लाभांकित झाले आहे. १६ ग्रामपंचायतअंतर्गत हे काम पूर्णत्वास आली आहे.
१८ मशीनचा वापर
पांदण रस्ते योजनेंतर्गत जिल्हा प्रशासनाकडून जेसीबी उपलब्ध करून दिले जाते. वर्धा, देवळी, सेलू व समुद्रपूर या तालुक्यांत प्रत्येकी ३, हिंगणघाट ४ व आर्वी तालुक्यात २ अशा १८ मशीन योजनेच्या कामावर लावण्यात आलेत. सद्यस्थितीत पवनार, वायगाव, आंजी, शिरपूर, येसगाव, आगरगाव, घोराड, सेलडोह, ब्राम्हणी, परसोडी, टेबंरी, जामणी, किनगाव, पोहणा, पिपरी, कोरा, नंदोरी, गिरड या ग्रामपंचायतीअंतर्गत कामे सुरू आहेत.
समुद्रपूर तालुक्यात लागवड क्षेत्र वाढणार
पांदण रस्त्यामुळे समुद्रपूर तालुक्यात ११५ हेक्टर आर क्षेत्र नव्याने लागवडीखाली आणण्यात यश आले आहे. या जागांवर झालेले अतिक्रमण हटविल्याने ते क्षेत्र उपलब्ध झाले आहे.
पालकमंत्री पांदण रस्ते योजना मे २०१७ पासून जिल्ह्यात अंमलात आली. आता राज्य शासनाने ही योजना स्वीकारून शेताची वहिवाट सोपी करण्यासाठी पुढाकार घेतला. वर्धा जिल्ह्यात या योजनेंतर्गत ८५ किमी पांदण रस्ते मोकळे करण्यात आले आहेत. आता शासनाने या योजनेवर मोहोर लावल्याने राज्यभरातील पांदण रस्ते मोकळे होणार आहेत.
- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी, वर्धा.