दुष्काळ निवारणार्थ ९२ ‘निर्माणी’ एकवटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 11:38 PM2019-05-07T23:38:29+5:302019-05-07T23:38:45+5:30
यंदाच्या वर्षीही भीषण दुष्काळ असून राज्य शासनाने २६ जिल्ह्यातील १५१ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले आहे. यातील ११२ तालुक्यांत गंभीर तर ३९ तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे शासनाचे म्हणणे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : यंदाच्या वर्षीही भीषण दुष्काळ असून राज्य शासनाने २६ जिल्ह्यातील १५१ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले आहे. यातील ११२ तालुक्यांत गंभीर तर ३९ तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे शासनाचे म्हणणे आहे. या दुष्काळ निवारणार्थ ‘निर्माण’च्या कृती शिक्षण उपक्रमांतर्गत सेलू तालुक्यातील हिवरा आणि दिंदोडा गावामध्ये त्रि-दिवसीय निवासी शिबीर पार पडले. यात राज्यभरातील ९२ निमार्णी युवा सहभागी झाले होते.
महाराष्ट्रातील युवांना सामाजिक समस्यांविषयी सजग करावे आणि त्यातून परिवर्तन घडवणारे नेतृत्व तयार व्हावे या हेतूने पद्मश्री डॉ. राणी बंग आणि डॉ. अभय बंग यांच्या पुढाकाराने ‘निर्माण’ हा उपक्रम जून २००६ मध्ये सुरू झाला आहे. या उपक्रमात सहभागी झालेले राज्यासह देशभरातील युवा विविध सामाजिक प्रश्नांवर काम करीत आहेत. शासनाबरोबरच विविध सामाजिक संस्था आणि संघटना आपापल्या परीने यावर मात करण्याचा प्रयत्न करत आहेत. दुष्काळाला हरवण्यासाठी पाणी फाऊंडेश मागील तीन वर्षांपासून विशेष प्रयत्न करीत आहे. स्पर्धेच्या माध्यमातून श्रमदान करून राज्यातील बरीच गावे जलसंवर्धनाची कामे करत आहेत. सेलू तालुक्यातील हिवरा आणि दिंदोडा ही दोन गावे स्वत:ला पाणीदार करून घेण्यासाठी या स्पर्धेत सहभागी झाली आहेत. गाव पाणीदार व्हावे याच उद्देशाने हिवरा व दिंदोडा या गावात पार पडलेल्या विशेष शिबिरात नागपूर, मुंबई, अकोला, वर्धा, पुणे, यवतमाळ, औरंगाबाद, चंद्रपूर, वाशिम अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले डॉक्टर, इंजिनीअर, समाजकार्य, वकील आदी सहभागी झाले होते.
तयार केला आराखडा
शिबिरार्थी युवांनी गाव, पाण्याचा प्रश्न, त्याची गंभीरता, त्यावरील उपाय, गावातील जीवनमान या गोष्टी अनुभवल्या आणि या पुढे मी शेती आणि पाण्यासाठी काय कृती करू शकतो त्याचा प्रत्येकांनी स्वत:चा आराखडा आखला. दोन्ही गावात एकूण ९४० घनमिटर एवढे काम झाले. ज्यामध्ये १४ लाख ११ हजार किंमतीचे ४७० टँकर पाणी सामावू शकेल. डॉ. उल्हास जाजू यांनी शिबिरार्थांना मार्गदर्शन केले.
श्रमदानाने झाली सुरुवात
शिबिरासाठा आलेल्यांचे ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने स्वागत केले. तसेच शिबीराची सुरूवात श्रमदानाने झाली. श्रमदानाव्यतिरिक्त शिबिरात पाणीप्रश्न समजून घेण्यासाठी वर्धा जिल्ह्यात शेती आणि पाणीप्रश्नांवर काम करणारे मंदार देशपांडे यांनी ‘पाणी आणि मी’ या विषयावर मार्गदर्शन केले. गावातील पाण्याची समस्या कशी आणि का निर्माण झाली या बाबतीत शिबिरार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला.